डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २५३५ ज्येष्ठांना समोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:57+5:302021-05-12T04:17:57+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत शहरातील शनिवार बाजार परिसरात नेत्र रुग्णालय आहे. मोतीबिंदू निर्मूलन या राष्ट्रीय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या ...

डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ठप्प; २५३५ ज्येष्ठांना समोर अंधार
जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत शहरातील शनिवार बाजार परिसरात नेत्र रुग्णालय आहे. मोतीबिंदू निर्मूलन या राष्ट्रीय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिकांच्या शस्त्रक्रिया याठिकाणी होतात. खासगी रुग्णालयांमध्ये अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठीही मोठी रक्कम मोजावी लागते. २५ हजारांपासून ते लाखापर्यंतची ही रक्कम जाते. हा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकदा सामान्य रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतात. याठिकाणी राष्ट्रीय योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया मोफत केली जाते. तेथे शहर व ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेतात. दररोज सुमारे १० ते २० जणांची शस्त्रक्रिया याठिकाणी होते. मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५३५ नागरिकांवर शस्त्रक्रिया झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेली ही सुविधा मार्च महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया बंद असल्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ५३५ ज्येष्ठांसमोर अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे नेत्र रुग्णालयात तातडीने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे.
नेत्र विभाग प्रमुखाचा कोट
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांचा आदेश मिळताच या नेत्र रुग्णालयातील शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत.
-किशन नाईक, नेत्र विभागप्रमुख, परभणी
अंधार कधी दूर होणार
‘मागील तीन महिन्यांपासून एका डोळ्याने दिसत नाही. त्यामुळे परभणी येथील शासकीय दवाखान्यातील नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर हे नेत्र रुग्णालय बंद झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सध्यातरी माझ्यासमोर अंधार निर्माण झाला आहे.
-मुंजाजी जुंबडे
-
‘महिनाभरापासून दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी दवाखान्यात २५ हजारांहून अधिक रुपये खर्च येतो. शासकीय दवाखान्यात या शस्त्रक्रिया करणे सोयीचे आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे शस्त्रक्रियागृह बंद झाल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
-कलावंतीबाई बनसोडे
गेल्या वर्षभरातील नेत्र शस्त्रक्रिया
२५३५
कोरोनाआधी महिन्याला होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया
५६९