प्रत्येक गावाला मिळणार नळाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:10+5:302021-02-05T06:06:10+5:30
परभणी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘हर घर नल से जल’ ही योजना हाती ...

प्रत्येक गावाला मिळणार नळाचे पाणी
परभणी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘हर घर नल से जल’ ही योजना हाती घेण्यात आली असून प्रत्येक गावाला नळाचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन प्रस्तावित आराखड्याची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.बाबाजानी दुर्राणी, आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.राहुल पाटील, आ.रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प.चे मुख्य अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक व्यक्तीला दरदिवशी किमान ५५ लिटर पाणी मिळाले पाहिजे. तसेच शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही पाणीपुरवठा योजना आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन मलिक यांनी यावेळी केले. जिल्ह्यासाठी ६८ हजार ६०४ नळ जोडण्यांंचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ७२ हजार ३९ नळजोडण्यांची नोंद संकेतस्थळावर झाली आहे. नळजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात जलजीवन मिशनअंतर्गत ३५ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ७५ ते १०० टक्के काम झालेल्या ९ योजना आहेत. ५० ते ७५ टक्क्यांमध्ये ४, २५ ते ५० टक्क्यांमध्ये ३ आणि ० ते २५ टक्क्यांमध्ये १६ योजना आहेत. त्यापैकी १८ योजनेद्वारे गावांना पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.
२०५ गावांना दरडोई ५५ लिटर पाणी
जलजीवन मिशनअंतर्गत २०२०-२१ चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात २०५ गावांना ५५ लिटर दरडोई पाणी उपलब्ध होत आहे. ही गावे अ वर्गात आहेत. तसेच ४० ते ४५ लिटर पाणी उपलब्ध होणारी ३१३, ४० लिटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध होणारी १४० गावे आहेत. अ वर्गवारीमधील ५१८ पैकी १५४ गावांचे ६ कोटी २५ लाख १४ हजार रुपयांचे अंदाजपत्रके तयार आहेत. ब वर्गवारीमधील ९ गावांचे २० लाख ३ हजार रुपये किमतीचे अंदाजपत्रक तयार आहे. संकेतस्थळावर नोंद नसलेल्या ४६ गावांपैकी ७ गावांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून २ कोटी ८७ लाख ४५ हजार रुपये या अंदाजपत्रकांची प्रस्तावित किंमत असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.