आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:16+5:302021-02-05T06:07:16+5:30
परभणी, : आजवर विकासाच्या संकल्पनेत जेवढे प्राधान्य आरोग्य सुविधांना दिले गेले. त्यात अधिकची भर आणि दक्षता घेण्याची गरज काळाने ...

आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देऊ
परभणी, : आजवर विकासाच्या संकल्पनेत जेवढे प्राधान्य आरोग्य सुविधांना दिले गेले. त्यात अधिकची भर आणि दक्षता घेण्याची गरज काळाने दाखवून दिली. ही गरज लक्षात घेवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा आणि शासकीय रुग्णालय अद्ययावत करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले. याच दृष्टीने जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारावे, या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात २६ जानेवारी रोजी आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभ प्रसंगी मलिक बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, खा.संजय जाधव, खा. फौजिया खान, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदींची उपस्थिती होती.
मलिक म्हणाले, देशातील जनतेने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडल्याने लोकशाही यशस्वी होण्यास मदत झाली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला समान संधी मिळाली पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळात एक नवीन योजना आखून त्यांना न्याय देण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय बनावटीची कोरोना लस ही अत्यंत सुरक्षित असून कुठल्याही अफवांना बळी पडू नये, तसेच कोरोनापासून आपला व कुटुंबातील सदस्याचा बचाव करण्यासाठी कोरोना लस सर्वांनी टोचून घ्यावी, असे आवाहनही मलिक यांनी यावेळी केले. आगामी काळात राज्य शासनामार्फत परभणी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा निर्णय निश्चित होईल, अशी ग्वाही मलिक यांनी दिली.
पोलिस दल, गृहरक्षक दल, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक, अग्निशामक दल, रुग्णवाहिका यांनी परेड संचालनातून मानवंदना दिली. तसेच कोव्हिड लसीकरण मोहीम, आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, महिला व बालविकास या विभागांनी देखाव्यावर चित्ररथ सादर केले. कोविड योद्धा म्हणून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉक्टर, पोलीस, महापालिका आदी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्या पोलिस अंमलदारांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर आदींसह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.