एकात्मिक शेतीमधून साधली आर्थिक प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:54+5:302021-09-02T04:38:54+5:30
काष्टे कुटुंबीयांकडे राजवाडी शिवारात दहा एकर शेती आहे. त्यामध्ये मोगरा, झेंडू, गुलाब या प्रकारच्या फुलांची एक एकरवर ...

एकात्मिक शेतीमधून साधली आर्थिक प्रगती
काष्टे कुटुंबीयांकडे राजवाडी शिवारात दहा एकर शेती आहे. त्यामध्ये मोगरा, झेंडू, गुलाब या प्रकारच्या फुलांची एक एकरवर लागवड आहे, तसेच एक एकर ऊस आहे. इतर पिकांमध्ये कापूस, सोयाबीन असे पिके आहेत. त्यांच्याकडे गीर गायीचे संगोपन केले जाते. चार गीर गायींसह दहा गायी, म्हैस, बैल आहेत. मोठा मुलगा योगेश हा गीर गायीचे दूध तालुक्याच्या ठिकाणी ७० रुपये प्रतिलिटरप्रमाणे दररोज ३५ ते ४० लिटर दुधाची विक्री करतो. यापासून ६५ ते ७० हजार रुपये महिना कमावतो. गीर गायीच्या दुधाला मागणी असल्यामुळे ग्राहकसुद्धा आवर्जून हे दूध वापरतात. दुसरा मुलगा अरुण हा वडिलांना शेतीमध्ये मदत करतो. फुलांचे व्यवस्थापन, लग्नसमारंभसाठी फुलांची बुकिंग करणे याकामी वडिलांना मदत करतो. मुरलीधर काष्टे यांच्या पत्नी आशामती काष्टे यादेखील गीर गायीचं व्यवस्थापन करतात. शेतीकामात मदत करतात. एकंदरीत शेतीला जोडधंद्याची साथ मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षमता मिळवली आहे. मागील वर्षी टाळेबंदीचा काळ वगळता फुलांपासून वर्षाकाठी दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, असे त्यांनी सांगितले. मुरलीधर काष्टे हे कृषी विभागाच्या शेतीशाळामध्ये नियमित सहभागी होतात व मार्गदर्शन घेतात. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक व्यवस्थापन करून शेतीतून आर्थिक विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले.
शेतीला दिली जोडधंद्याची जोड
पारंपरिक शेती व्यवसायात अनेक वेळा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून, तसेच कृषी तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेऊन आणि योग्य व्यवस्थापन करून शेतीतून चांगले उत्पन्न घेता येते, तसेच शेतीला दूध आणि फुलशेतीची जोड दिली, तर वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळू शकते. हे काष्टे यांनी सिद्ध केले आहे.
गावातच फूल विक्री स्टाॅल
मुरलीधर काष्टे यांचे शेत व घर हे गावालगत मुख्य रस्त्यावर असल्याने त्यांनी फूलविक्रीसाठी स्टाॅल उभारला आहे. कृषी विभागाच्या वतीने विकेल ते पिकेल योजनेंतर्गत मार्गदर्शन घेतल्यामुळे गावात व जवळपासच्या खेड्यांमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होते व यातून आर्थिक नफा होतो. सेलू ते वालूर रस्त्यावर स्टाॅल असल्यामुळे मार्गावरील ग्राहक फुलांची खरेदी करतात, तसेच गावाजवळ लागूनच प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात तालुक्यातील भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याने फूल विक्रीस चालना मिळाली आहे.