रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा; तीन रस्त्यांच्या मार्गात कोणाचा दांडा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST2021-08-24T04:22:53+5:302021-08-24T04:22:53+5:30
परभणी : जिल्ह्यातील तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांची कामे राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने या रस्त्यावरील वाहनधारक ...

रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा; तीन रस्त्यांच्या मार्गात कोणाचा दांडा ?
परभणी : जिल्ह्यातील तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांची कामे राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णत्वास जात नसल्याने या रस्त्यावरील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामात कोण आडकाठी आणत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेल्या तक्रारीनंतर या पत्राची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड आणि झिरो फाटा-मानवत रोड या तीन राष्ट्रीय महामार्गांचे अत्यांत मंद गतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या रस्त्यांच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधली आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या रस्त्यांच्या प्रश्नावर त्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरेच आरोप प्रत्यारोप झाले होते. आता हे दोन्ही पक्ष राज्यांत एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे ते गप्प आहेत हे समजू शकतो; परंतु राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपही या प्रश्नावर चुप्पी साधून आहे. त्यामुळे या रस्त्यांचे राजकारण होतंय तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय परभणी जिल्ह्यात नसल्याने याचा जाबही या कार्यालयाच्या नांदेड येथील कार्यालयात जाऊन कोणी विचारत नाही. त्यामुळे या रस्त्यांच्या अपूर्ण कामाचा प्रश्न सुटेनासा झाला आहे.
परभणी-जिंतूर
परभणी-जिंतूर या ४१ कि.मी.च्या रस्त्याचे सप्टेंबर २०१७ पासून काम सुरू आहे. अद्याप १६ कि.मी.चे व पुलांचे काम बाकी आहे. रस्त्यासाठी २१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.
परभणी-गंगाखेड
परभणी-गंगाखेड या ४५ कि.मी.च्या कामाला सप्टेंबर २०१७ पासून सुरुवात झाली. यासाठी २०२ कोटींचा निधी मंजूर आहे. या रस्त्यावरील पुलांचे काम अपूर्ण आहे.
मानवत रोड-झिरो फाटा
मानवत रोड ते झिरो फाटा या राष्ट्रीय महामार्ग ६४ चे ५१ किमीचे काम मागील सात वर्षांपासून काम पूर्ण झालेले नाही. या कामासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामाचे ५ कंत्राटदार बदलले आहेत. तरीही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामातही मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारी प्रशासकीय यंत्रणेकडे करण्यात आल्या होत्या.
राजकारणी काय म्हणतात?
प्रशासकीय पातळीवर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. कामाच्या दिरंगाईसाठी कंत्राटदारांच्या चुका कारणीभूत आहेत. शिवसेनेचा विकासकामांना नेहमीच पाठिंबा आहे.
- विशाल कदम, जिल्हाप्रमुख, शिवसेना
काही लोकप्रतिनिधींच्या आडमुठ्या धोरणांमुळे प्रमुख रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याची लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या वेळी चर्चा होती. याबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे.
- सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप
लोकसभा निवडणुकीच्या वेळी या विषयावर चर्चा झाली होती; परंतु कंत्राटदारांनी त्यांचे काम केले पाहिजे. कोणी त्रास देत असेल तर सरळ पोलिसांकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
- राजेश विटेकर, माजी जि. प. अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रीय महामार्गांच्या कामास होत असलेल्या दिरंगाईस कंत्राटदार जबाबदार आहेत. प्रत्यक्ष कामाच्या किमतीच्या कमी दराने निविदा घेतात, नंतर त्या दरात काम होत नसल्याने ते प्रलंबित ठेततात.
- नदीम इनामदार परभणी शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस