निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्यामुळे गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 16:03 IST2017-09-21T16:03:43+5:302017-09-21T16:03:56+5:30
चुकीची माहिती देऊन निवडणूक कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी परभणीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली

निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्यामुळे गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस
परभणी, दि.21 : चुकीची माहिती देऊन निवडणूक कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी परभणीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये, याविषयी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
परभणी तालुक्यात २९ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक कामासाठी कर्मचा-यांची माहिती मागविली असता गटशिक्षणाधिका-यांनी चुकीची माहिती सादर केली. गटशिक्षणाधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार असोला येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील एकाही शिक्षकाचे नाव यादीत दिले नाही. तसेच प्राथमिक शाळा जांब येथील एकाच शिक्षकाचे नाव दोन वेळेस देण्यात आले. त्यामुळे त्या शिक्षकास दोन वेळा निवडणूक कामांचे आदेश पारित झाले. तर असोला शाळेतील एकही शिक्षक निवडणूक कामासाठी घेता आला नाही. यावरुन निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याचे सिद्ध होत असून, या प्रकरणी खुलासा सादर करावा अन्यथा एकतर्फी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असेही या नोटिसीत म्हटले आहे.