पालम तालुक्यात पुरामुळे दोन हजार हेक्टर पिके पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 17:38 IST2019-09-02T17:37:26+5:302019-09-02T17:38:51+5:30
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

पालम तालुक्यात पुरामुळे दोन हजार हेक्टर पिके पाण्याखाली
पालम : तालुक्यातील लेंडी व गळाटी नदीला मागील दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. दोन्ही नद्या दुधडी भरून वाहत असल्याने नदीकाठचे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
मागील चार दिवसांपासून पालम तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहता आहेत. 31 ऑगस्टपासून पाऊस सुरू झाल्याने एक व दोन सप्टेंबर रोजी पालम तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. नदीचे पात्र लहान असल्याने पुराचे पाणी पात्राबाहेर निघून आजूबाजूच्या शेतशिवारात शिरले आहे. त्यामुळे खरिप हंगामामधील सोयाबीन,कापूस, मूग, संकरित ज्वारी, तूर आदी पिके 2 दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. तसेच पुराच्या प्रवाहामुळे नदीकाठावरील शेतजमिनीची मोती मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. यात जवळपास दोन हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या गावातील शेतीचे झाले नुकसान
गळाटी नदीमुळे नावा,नावलगाव, कांदलगाव,केरवाडी, सायळा, शिरपूर, कापशी,आरखेड, सोमेश्वर घोडा, लेंडी नदीच्या पुरामुळे आडगाव, वनभुजवाडी, पुयणी, पालम, गुळखंड, जवळा व फळा आणि सेलु पेंडू नदीमुळे वानवाडी, सर्फराजपुर, कोळवाडी, पालम शिवार या गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.