दुभाजकावरील झाडांना पाणी
परभणी : शहरातील रस्त्यावरील दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना मनपाने टँकरच्या साह्याने पाणी दिले. सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, झाडे वाळू लागली आहेत. ही बाब लक्षात घेता मनपाने टँकरच्या साह्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे.
जायकवाडी परिसरातील नाली तुंबली
परभणी : शहरातील जायकवाडी कार्यालयासमोरील नाली पाण्याने तुंबली आहे. नालीचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे या भागात गेल्यामुळे दुर्गंधी पसरली असून, महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या नालीची स्वच्छता करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
व्हॉल्व्ह टाकण्याचे काम सुरूच
परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानापासून निघालेल्या जलवाहिनीला ठिकाणी व्हॉल्व्ह टाकण्याचे काम सुरू आहे. सध्या वसमतरोडवर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या परिसरात खोदकाम करण्यात आले आहे. मागील महिन्याभरापासून या भागात जलवाहिनी आणि व्हॉल्व्ह टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
परभणी : शहरातील ग्रामीण भागांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने थकबाकीच्या नावाखाली अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. जलस्रोतांना पाणी उपलब्ध असतानाही नळ योजनेद्वारे पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाणीटंचाई निवारणाच्या कामांना खो
परभणी : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेतली जातात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे टंचाई कृती आराखडे आणि इतर कामांना अजूनही गती मिळाली नाही. ग्रामीण भागात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विहीर अधिग्रहण, तात्पुरती पूरक पाणीपुरवठा योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, आदी कामे हाती घ्यावी लागतात. सध्यातरी या कामांना गती मिळाली नाही.
खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था
परभणी : शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. भिकुलाल पेट्रोल पंपापासून जनता मार्केटकडे येणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. हा रस्ता आधीच अरुंद असून, अनेक जड वाहने या रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.