म्युकरमायकोसिसवरील औषधी, इंजेक्शन जिल्ह्यात नाही उपलब्ध;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:26+5:302021-05-16T04:16:26+5:30

दुर्मीळ आजार : रुग्णांना उपचारासाठी परजिल्ह्यात व्हावे लागते स्थलांतरित लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील ...

Drugs on mucomycosis, not available in injection district; | म्युकरमायकोसिसवरील औषधी, इंजेक्शन जिल्ह्यात नाही उपलब्ध;

म्युकरमायकोसिसवरील औषधी, इंजेक्शन जिल्ह्यात नाही उपलब्ध;

दुर्मीळ आजार : रुग्णांना उपचारासाठी परजिल्ह्यात व्हावे लागते स्थलांतरित

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजारावरील लिपोसोमल एफ्मोटोसिरीन बी हे इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनावर उपचार घेणाऱ्या काही रुग्णांना उपचारादरम्यान किंवा बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे जिल्ह्यातही आढळली आहेत. काळ्या बुरशीचा हा आजार अतिशय दुर्मीळ आहे. त्यामुळे यापूर्वी जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळत असत. आता तीन रुग्णांना या आजाराची लक्षणे आढळत असल्याने या आजारावरील लिपोसोमल एम्फोटोसिरीन बी या इंजेक्शनची मागणी होत आहे. ही मागणी मोठ्या प्रमाणात नसली तरी जिल्ह्यात या इंजेक्शनचा साठाच उपलब्ध नाही. जिल्हा प्रशासनाने म्युकरमायकोसिस आजारावर लागणाऱ्या औषधींची साठा कंपन्यांकडे नोंदविला आहे. मात्र, अद्याप तरी ही औषधी उपलब्ध झाली नाही.

सध्या या आजाराची लक्षणे आढळल्यानंतर रुग्णास औरंगाबाद किंवा इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.

उपचारासाठी इतर जिल्ह्यांकडे धाव

म्युकरमायकोसिस या आजारावर वेगवेगळ्या अवयवांच्या तज्ज्ञांकडून उपचार करावे लागतात. रुग्णांना लक्षणे जाणवल्यानंतर एमआरआय केल्यानंतरच संसर्ग किती पसरला आहे, त्यावर उपचार पद्धती अवलंबून आहे.

प्राथमिक उपचार जरी जिल्ह्यात होत असले तरी पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी इतर जिल्ह्यांत जाऊनच रुग्णांना उपचार करावे लागत आहेत.

जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे औषधींची मागणीही मर्यादित आहे. प्रशासन जिल्ह्यात ही औषधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अद्याप झाला नाही पुरवठा

मोजक्याच रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे जाणवत आहेत. त्यासाठीची औषधी महागडी आहे. यापूर्वी या औषधींचा वापर झाला नसल्याने सध्या प्रशासनाकडून मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, अद्याप या औषधीचा पुरवठा झालेला नाही.

ओठ, नाक, जबड्याला फटका

या आजारात सर्वप्रथम नाकाला इन्फेक्शन होते. त्यानंतर डोळ्यांच्या जवळ त्वचा काळी होते.

डोळा सुजणे, लाल होणे, डबल दिसणे अशी डोळ्यांची लक्षणे आहेत.

दात दुखणे, हिरड्या सुजणे, दातांजवळ काळा थर जमा होणे ही लक्षणेही सांगितली जात आहेत.

संसर्गाच्या प्रमाणानुसार ठरविले जातात डोस

म्युकरमायकोसिस आजार झाल्यानंतर त्यास लिफोसोमल एम्फोटोसिरीन बी हे इंजेक्शन दिले जाते.

रुग्णाच्या संसर्गानुसार त्याला इंजेक्शनचे किती डोस लागतात, हे ठरविले जाते.

साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत हे डोस द्यावे लागतात.

मधुमेह चाचणी करा

एमआरआय केल्यानंतरच आजाराचा संसर्ग कळतो. कोविडनंतर मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी नियमित मधुमेह चाचणी करावी. शुगर लेव्हल मेंटेन ठेवावे. काही लक्षणे दिसू लागली तर तातडीने तज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत.

- डॉ. तेजस तांबोळी

डोळ्यांची लक्षणे...

हायफ्लो ऑक्सिजन, स्टेरॉइडचा वापर झालेल्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर

डोळ्यांच्या खालची पापणी थोडी वाकडी होणे, डोळे लाल होणे, सुजणे, डोळे दुखणे, नजर कमी होणे, अशी लक्षणे आढळल्यास नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे.

- डॉ.हनुमंत भोसले

तज्ज्ञांच्या पथकामार्फत उपचार

म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे सुरुवातीला नाक आणि डोळ्यांना दिसतात. त्यानंतर दातांनाही लक्षणे जाणवू लागतात. त्यात दातांमध्ये वेदना होणे, हिरड्या सुजणे, दातांजवळ काळा थर जमा होणे, अशी लक्षणे दिसतात. या आजारात तज्ज्ञांच्या पथकाच्या निगराणीखाली उपचार करावे लागतात.- डॉ.नितीन सोमाणी

Web Title: Drugs on mucomycosis, not available in injection district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.