जिल्ह्यातील लसीचा साठा पुन्हा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:43+5:302021-04-16T04:16:43+5:30
परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीचा जिल्ह्यातील साठा पुन्हा एकदा संपला असून, आता राज्य स्तरावरून लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

जिल्ह्यातील लसीचा साठा पुन्हा संपला
परभणी : कोरोना प्रतिबंधक लसीचा जिल्ह्यातील साठा पुन्हा एकदा संपला असून, आता राज्य स्तरावरून लसीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ५ हजार १७ नागरिकांना लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने नागरिकांचा लसीकरणासाठी ओढा वाढला आहे; परंतु त्यातच लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने प्रशासनासमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे १७ हजार डोस प्राप्त झाले होते. त्यातून जिल्हाभरात लसीकरण करण्यात आले. ही लस आता संपली आहे. जिल्ह्यात आता कोविशिल्ड आणि को-वॉक्सिन यापैकी एकही लस उपलब्ध नाही. त्यामुळे शुक्रवारी लसीकरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५ हजार १७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ४६ हजार ६११ महिलांनी लस घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात ७ हजार ९५३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य खात्यातील ३ हजार ५७६, कोरोना योद्धा असलेल्या २ हजार ४११, ४५ वर्षा पुढील १ हजार ९६६ नागरिकांनी दिवसभरात लस घेतली आहे. जिल्ह्यात सध्या केंद्र स्तरावर लस उपलब्ध आहे. शुक्रवारपर्यंत ही लस संपण्याची शक्यता आहे.
लसीची नोंदवली मागणी
जिल्ह्यासाठी लस उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने मागणी नोंदविली आहे. शुक्रवारी औरंगाबाद येथून काही ना काही प्रमाणात लस उपलब्ध होईल, अशी अशा अधिकाऱ्यांना आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतरच जिल्ह्यातील लसीकरण सुरू होईल, असे दिसते.