परभणी : जिल्हाधिकारी पी. ए.मार्फत पैसे घेतात, असा खासदारांनी आरोप केला, तर जिल्हा नियोजन अधिकारी २ टक्के घेतल्याशिवाय एकही फाईल काढत नाहीत, असा आरोप सर्वच खासदार, आमदारांनी केल्यामुळे नियोजन अधिकारी किशोरसिंह परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जिल्हा कचेरीत घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची उपस्थिती होती.
पैसे कुणासाठी घेता ?
जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर २ टक्के घेतल्याचा आरोप झाल्यानंतर हा माझाच विभाग आहे, हे पैसे तुम्ही कुणासाठी घेता अन् कुणाला देता?
असा सवाल पवार यांनी केला, सोमवारी सुनावणीसाठी मंत्रालयात भेटा, असा इशारा दिला.
बैठकीच्या सुरुवातीलाच पवार यांनी परिसरातील अस्वच्छता पाहून जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. परिसर आणि तुमचा चेहरा पाहूनच सगळे कळते, असे वक्तव्य त्यांनी केले.
माहिती नसल्याने संताप
निराधारांच्या प्रश्नावर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे योग्य माहिती नसल्यानेही पवार यांनी संताप व्यक्त केला, या विभागाच्या प्रधान सचिवांनाच थेट फोन केला. डीबीटीद्वारे निराधारांना पगार वाटप होण्यासाठी केवायसी केली नसल्याने हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
आता टंचाईत भरपूर निधी आहे. मागणी करा, अडचण येणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली, तर शिव व पाणंद रस्ते मागणीप्रमाणे मंजूर करून त्याचे योग्य नियोजन करण्यासही बजावले.