सहा महिन्यांत 1176 जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:17 IST2021-02-10T04:17:20+5:302021-02-10T04:17:20+5:30
परभणी : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज ऑनलाईन झाल्यानंतर १ ऑगस्टपासून आत्तापर्यंत दाखल १ हजार ३७७ प्रकरणांपैकी ...

सहा महिन्यांत 1176 जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण
परभणी : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज ऑनलाईन झाल्यानंतर १ ऑगस्टपासून आत्तापर्यंत दाखल १ हजार ३७७ प्रकरणांपैकी १ हजार १७६ प्रकरणात संबंधितांना जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज १ ऑगस्टपासून ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे समितीच्या कामकाजाला गती मिळाली आहे. १ ऑगस्ट २०२०पासून ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत १ हजार ३७७ जणांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. त्यातील १ हजार १७६ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. २०१ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रकरणाची निकड लक्षात घेऊन त्याच दिवशी संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याचे कामही या समितीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
महत्वाची पदे रिक्त
जिल्हा यात प्रमाणपत्र पडताळणी समितीत सध्या आऊटसोर्सिंगचे ६ तर राज्य शासनाच्या सेवेतील ५ असे ११ कर्मचारी- अधिकारी कार्यरत आहेत. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, दक्षता अधिकारी, स्टेनो ग्राफर आदी महत्वाची पदे रिक्त आहेत.
‘‘उस्मानाबाद येथे बी.फार्मसीसाठी नंबर लागल्याने प्रवेशासाठी तातडीने प्रमाणपत्राची आवश्यकता होती. या अनुषंगाने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली. त्यानंतर २९जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता प्रस्ताव दाखल केला. सायंकाळी ५.३० वाजता प्रमाणपत्र हातात मिळाले. त्यामुळे वेळेत प्रवेश घेता आला. कामकाजाबद्दल समाधान वाटते.
- रिते अंभोरे, सेलू विद्यार्थी