अंगणवाडीच्या निधी वितरणावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:26+5:302021-05-01T04:16:26+5:30
परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंगणवाडीच्या निधीवरून वाद निर्माण झाला असून, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बांधकाम ...

अंगणवाडीच्या निधी वितरणावरून वाद
परभणी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंगणवाडीच्या निधीवरून वाद निर्माण झाला असून, जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी बांधकाम न करताच ५ लाख ९३ हजारांचा निधी गायब केल्याचा आरोप आ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे, तर उपाध्यक्ष चाैधरी यांनी हे आरोप फेटाळत सद्य:स्थितीत अंगणवाडीचे बांधकाम सुरू असल्याचे सांगितले आहे.
जिल्हा नियोजन समितीने २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी जि. प.ला अंगणवाडी बांधकामासाठी निधी दिला होता. त्यानुसार बोरी येथे अंगणवाडीचे बांधकाम करण्यासाठी ५ लाख ९३ हजार १३३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हे अंगणवाडीचे बांधकाम न करताच जि. प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी ग्रामपंचायतीमार्फत यासाठीचे पूर्ण बिल उचलून अपहार केल्याचा आरोप भाजपच्या आ. मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. सत्तेचा गैरवापर करीत हे काम करण्यापूर्वीच १२ फेब्रुवारी रोजी चौधरी यांनी कामाचे बिल उचलले. त्यानुसार या अंगणवाडीच्या कामाच्या नोंदी मोजमाप पुस्तिकेत घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेकडून कामाची ५ लक्ष ९३ हजार १५५ रुपयांची देयके आरटीजीएसद्वारे हस्तांतरितही करण्यात आली. याबाबत आपण जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधित खाते होल्ड ठेवण्याचे असे लेखी आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच बोरी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनाही निधीचा अपव्यय न होऊ देणेबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौधरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
पराभवाच्या नैराश्येतून आरोप : चौधरी
जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी बांधकामाचा निधी उचलून खर्च केलेला नाही. पूर्वी ज्या भागात अंगणवाडी मंजूर झाली, त्या भागात जागा मिळत नसल्याने इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून अंगणवाडीचे बांधकाम सध्या सुरू केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवातून नैराश्य आल्याने आ. मेघना बोर्डीकर यांनी हा आरोप केला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांकडे बसून त्यांना त्रास देण्याऐवजी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून तोच वेळ त्यांनी जनतेच्या सेवेसाठी द्यावा, असे चौधरी म्हणाले.