अपमान वाटल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांनीच युती तोडली - आदित्य ठाकरे
By Admin | Updated: October 12, 2014 12:01 IST2014-10-12T12:01:19+5:302014-10-12T12:01:19+5:30
२४ वर्षांचा पोरगा आम्हाला शिकवतोय, याचा राग राज्यातील भाजपच्या नेत्यांना आला व अपमान झाला म्हणून त्यांनीच युती तोडली व शिवसेनेशी गद्दारी केली, असा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.

अपमान वाटल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांनीच युती तोडली - आदित्य ठाकरे
परभणी : भाजपला आम्ही भावासमान मानले. युती तुटू नये म्हणून मी स्वत: दोन दिवस प्रयत्न केले. बोलणीही चांगली झाली होती. परंतु २४ वर्षांचा पोरगा आम्हाला शिकवतोय, याचा राग राज्यातील भाजपच्या नेत्यांना आला आणि अपमान झाला म्हणून त्यांनीच युती तोडली व शिवसेनेशी गद्दारी केली, असा आरोप युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला.
परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ ११ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आदित्य ठाकरे यांची सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, खा.संजय जाधव, उमेदवार डॉ. राहुल पाटील, पाथरी मतदार संघाच्या शिवसेना उमेदवार मीराताई रेंगे, गंगाखेडचे उमेदवार प्राचार्य डॉ.शिवाजी दळणर, जिंतूरचे उमेदवार राम खराबे पाटील, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, कल्याणराव रेंगे आदींची उपस्थिती होती. आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तेसाठी आम्ही कधीही युती केली नाही.परंतु विकासासाठी, एका विचारासाठी आणि एक परिवार म्हणून भाजपसोबतची युती होती. ३0 वर्षांपासूनची ही युती तूटू नये म्हणून मी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु राज्यातील काही नेत्यांनीच ही युती तोडली आणि शिवसेनेशी गद्दारी केली आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेशी गद्दारी होते तेव्हा परभणीतून शिवसेनेला साथ मिळते, असा इतिहास आहे. त्यामुळेच मी आज परभणीत आलो असल्याचे आदित्य ठाकरे सांनी सांगितले.
ते म्हणाले, शिवसेना हा तरुणांचा आवाज आहे. भाजपने तरुणांचा अपमान केल्याने ही स्वाभिमानाची लढाई आहे. तेव्हा तरुणांनी महाराष्ट्राची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात विष पेरु नका. विकासाच्या गोष्टी करा, आम्ही त्याचे स्वागत करु पण रक्ताच्या गोष्टी कराल तर याद राखा, असा इशारा त्यांनी एम.आय.एम.ला दिला. यावेळी आदेश बांदेकर, खा.संजय जाधव, डॉ. राहुल पाटील, मीराताई रेंगे यांचीही भाषणे झाली. या सभेला शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)