रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय
By Admin | Updated: December 22, 2014 15:11 IST2014-12-22T15:11:03+5:302014-12-22T15:11:03+5:30
तालुक्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून ही पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय
>पालम : तालुक्यातील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. मागील अनेक वर्षांपासून ही पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
तालुक्यात चाटोरी वरावराजूर येथे आरोग्य विभागाचे आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रात ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार व्हावेत, ही अपेक्षा असते. परंतु, आरोग्य विभागाच्या या दुर्लक्षामुळे रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.
या आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा नेहमीच होत असल्याने रुग्णांनी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. चारोटी केंद्रात वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, अधिपरिचारिका, आरोग्यसेवक, वाहनचालक अशी नऊ पदे रिक्त आहेत. तर रावराजूर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यासह चार पदे रिक्त आहेत. नवीन इमारत असूनही रुग्णांना व कर्मचार्यांना पिण्यासाठी पाणी नाही. तसेच व्यवस्थित विद्युत पुरवठा होत नाही. तसेच शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर चांगल्या सेवा मिळणे कठीण झाले आहे. याच आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळगाव मु., फरकंडा, शेख राजूर या उपकेंद्राच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत.
आरोग्य केंद्रात चांगली उपचार सेवा मिळण्याऐवजी रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पालम येथेही आरोग्य विभागाला कार्यालयासाठी भाड्याच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी वेढला आहे. याकडे लक्षदेणे गरजेचे आहे. /(प्रतिनिधी)