मृत्यूच्या आकडेवारीमध्ये दोन विभागात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:13 IST2021-06-10T04:13:37+5:302021-06-10T04:13:37+5:30
परभणी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दररोज होणाऱ्या मृत्यूची एकत्रित नोंद आरोग्य विभाग ठेवते. ही नोंद दररोज कोरोनाच्या रुग्णसंदर्भात ...

मृत्यूच्या आकडेवारीमध्ये दोन विभागात तफावत
परभणी शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दररोज होणाऱ्या मृत्यूची एकत्रित नोंद आरोग्य विभाग ठेवते. ही नोंद दररोज कोरोनाच्या रुग्णसंदर्भात काढल्या जाणाऱ्या प्रेस नोटमध्ये दिली जाते. मात्र, मंगळवारी महापालिका पथकाने अंत्यसंस्कार केलेल्या ४ जणांची नोंद आरोग्य विभागाने का घेतली नाही किंवा महापालिकेने केलेल्या अंत्यसंस्काराची माहिती जिल्हा रुग्णालय आरोग्य विभागाला दिली गेली नाही का, हे मात्र न समजण्यासारखे आहे. मंगळवारी कोरोनाने मयत झालेल्या ४ जणांचे अंत्यसंकार केल्याचे महापालिकेच्या एका सुत्राने स्पष्ट केले.
महापालिकेकडे १२९२ जणांची नोंद
महापालिकेचे मृतांचे अंत्यसंस्कार करणारे पथक शहरात खासगी रुग्णालय व शासकीय रुग्णालयात झालेल्या सर्व बाबींची नोंद ठेवत आहे. मंगळवारपर्यंंत या पथकाने १२९२ जणांचे अंत्यसंस्कार केले आहेत. यासाठी ६४ लाख ६० हजारांचा खर्च महापालिका विभागाने केला आहे. याउलट जिल्हा आरोग्य विभागाकडे १२४९ मृत्यू कोरोनाने झालेल्यांची नोंद मंगळवारपर्यंत आहे. या दोन्ही विभागाच्या आकडेवारीत तब्बल ४३ मृत्यूची तफावत आहे.
आरोग्य विभाग अनभिज्ञ
जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी फोन केल्यावर माहिती देण्यास फारसा प्रतिसाद देत नाहीत. महापालिका स्तरावर होणारे लसीकरण, दररोजच्या कोरोना चाचणी त्यातील शहर महापालिका स्तरावरचे निघणारे पाँझिटिव्ह रुग्ण याची परिपुर्ण माहिती मनपा विभाग ठेवत असला तरी ही माहिती दिली जात नाही. याऊलट आरोग्य विभागाने हे ४३ मृत्यू का दडवले, याची माहितीही अद्याप दिली नाही.
६ जूनला एकही अंत्यसंस्कार पथकाने केला नाही
मागील तीन दिवसांपूर्वी महापालिका अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकाने ६ जूनला एकही मृत्यू नसल्याने अंत्यसंस्कार प्रक्रीया केली नाही. १ ऑगस्ट २०२० नंतर पहिल्यांदाच पथकाला अंत्यसंस्काराच्या जबाबदारीतून एक दिवस विश्रांती मिळाली.