राज्य शासनाकडून मिळालेल्या १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:42+5:302021-05-29T04:14:42+5:30
जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या आणि नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका ...

राज्य शासनाकडून मिळालेल्या १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण
जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने जुन्या आणि नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका २८ मे रोजी जिल्ह्याला प्राप्त झाल्या असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती गणेशराव घाटगे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागासाठी या रुग्णवाहिका फायदेशीर ठरणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांनी केले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका जुन्या झाल्या आहेत. या रुग्णवाहिका नव्याने प्राप्त करण्यासाठी खासदार बंडू जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सभापती अंजलीताई आणेराव यांनी दिली. कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्याधिकारी तसेच रुग्णवाहिका चालक उपस्थित होते.
या केंद्रांना मिळाल्या रुग्णवाहिका
आर्वी (ता. परभणी), कोद्री, पिंपळदरी, मरडसगाव (ता. गंगाखेड), आसेगाव (ता. जिंतूर), वालूर, चिकलठाणा (ता. सेलू), बनवास (ता. पालम), एरंडेश्वर (ता. पूर्णा) आणि शेळगाव (ता. सेलू).