चाचण्या कमी झाल्याने रूग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी दर ३२ टक्के कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:24+5:302021-05-06T04:18:24+5:30

परभणी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनासंशयित व्यक्तींच्या चाचण्या घटत असल्या, तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२.५० टक्के आहे. ...

Decreased trials reduced patient numbers; Positivity rate maintained at 32% | चाचण्या कमी झाल्याने रूग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी दर ३२ टक्के कायम

चाचण्या कमी झाल्याने रूग्णसंख्या घटली; पॉझिटिव्हिटी दर ३२ टक्के कायम

Next

परभणी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनासंशयित व्यक्तींच्या चाचण्या घटत असल्या, तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२.५० टक्के आहे. त्यामुळे रूग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात दिनांक १ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ७८ हजार ६९५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तब्बल २५ हजार १६० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा पॉझिटिव्हिटी दर जवळपास ३२ टक्के आहे. यापूर्वी संशयितांच्या चाचण्या अधिक प्रमाणात होत होत्या. त्यावेळचा पॉझिटिव्हिटी दर आणि आता चाचण्या कमी होत असतानाचा पॉझिटिव्हिटी दर सारखाच असल्याने बाधितांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला संशयितांच्या चाचण्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागात तपासणी कमीच

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाने ३ मेपर्यंत ग्रामीण भागात ७४ हजार २१४ जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यात ६ हजार ४८२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण ८.७३ टक्के आहे.

याशिवाय याच कालावधीत ग्रामीण भागात ३६ हजार ३७८ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यात ४ हजार ३१३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण ११.८५ टक्के आहे.

ग्रामीण भागात मुळातच तपासणीचे प्रमाण खूप कमी आहे. अनेकजण भीतीपोटी किंवा अज्ञानातून आजार अंगावर काढत आहेत.

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

ॲन्टिजेन चाचणीच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचणीमध्ये अधिक अचुकता असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रक्रियेला म्हणावा तसा वेग येत नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ६२ हजार ९७४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात २३ हजार ७१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १४.५४ टक्के आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात...

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज ५ हजार तर शहरी भागात किमान १ हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आरोग्य विभागाला आदेश देण्यात आले आहेत. ज्या गावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत, त्या गावांमध्ये १०० टक्के आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत.

- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

Web Title: Decreased trials reduced patient numbers; Positivity rate maintained at 32%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.