कोरोनाच्या संसर्गाने डेंग्यूचा घटला प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:33+5:302021-02-06T04:29:33+5:30
दरवर्षी जिल्ह्यात तापीच्या साथी येत असतात. हवामान बदलानुसार या साथी डोके वर काढतात आणि नागरिकांना दवाखाना धरायला लावतात; मात्र ...

कोरोनाच्या संसर्गाने डेंग्यूचा घटला प्रभाव
दरवर्षी जिल्ह्यात तापीच्या साथी येत असतात. हवामान बदलानुसार या साथी डोके वर काढतात आणि नागरिकांना दवाखाना धरायला लावतात; मात्र २०२० या वर्षात कोरोनाच्या संसर्गापुढे इतर सर्वच साथीचे आजार मागे पडल्याचे दिसून आले. २०२० च्या एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाला प्रारंभ झाला. एक-एक करीत रुग्णांची संख्या साडेसात हजारांपर्यंत पोहोचली. संपूर्ण वर्ष जिल्हावासीयांनी भीतीच्या सावटाखाली घालवले. आता हा संसर्ग कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे; मात्र दरवर्षी येणाऱ्या साथीच्या आजारांची आकडेवारी पाहिली तर कोरोनापुढे इतर सर्वच साथी गायब झाल्यासारख्या होत्या.
डेंग्यूचा ताप ही साथही दरवर्षी जिल्ह्यात पसरते. या तापीमुळे मृत्यूही ओढवतो. २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू असताना या डेंग्यूच्या तापीचे केवळ ८ रुग्ण नोंद झाले आहेत. त्यात महानगरपालिकेच्या हद्दीतील २ आणि ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये हीच रुग्णसंख्या ४९ एवढी होती. २०१९ मध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत २७ आणि उर्वरित जिल्ह्यात २२ रुग्णांची नोंद झाली आहे.
एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
जिल्ह्यातील डेंग्यूच्या साथीसंदर्भात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने रुग्णांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. या नोंदीनुसार २०२० मध्ये जिल्ह्यात डेंग्यूच्या ८ रुग्णांची नोंद झाली असली तरी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांच्या काळात डेंग्यूचे रुग्ण दरवर्षी आढळले; मात्र एकाही वर्षात रुग्ण दगावला नसल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले.
पाच वर्षांतील डेंग्यूचे रुग्ण
वर्ष रुग्ण
२०१५ : ०५
२०१६ : १६
२०१७ : ०१
२०१८ : ३०
२०१९ : ४९
२०२०: ०८