विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा
By ज्ञानेश्वर भाले | Updated: October 24, 2023 15:56 IST2023-10-24T15:56:18+5:302023-10-24T15:56:35+5:30
महागावातील घटना; पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी

विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कुटुंबावर शोककळा
ताडकळस (जि.परभणी) : शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना पूर्णा तालुक्यातील महागावात उघडकीस आली. राजवीर अनिल भुमरे (६), गौरी अनिल भुमरे (८) असे मयत बहीण-भावाचे नाव आहे. मयत दोन्ही बालके आईसोबत महागाव येथे आजोबांकडे आली होती.
सोमवारी दुपारी दोन्ही बालके शेत शिवारातील आखाड्यावर खेळत होती. अचानक मुले दिसेनाशी झाल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. परिसरात शोधाशोध केल्यानंतर उपस्थित काही जणांनी विहिरीत पाहिले असता मुलांचे मृतदेह दिसले. घटनेची माहिती ताडकळस पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच सपोनि. कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर तरडे, पोलिस अंमलदार संभाजी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गिनगिने यांनी शवविच्छेदन केले. या घटनेने महागावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.