येलदरी जलाशयात आढळला मृतावस्थेतील बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:57+5:302021-05-15T04:16:57+5:30
कोठा, किन्ही या गावच्या काही मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना १४ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास मृतावस्थेतील बिबट्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून ...

येलदरी जलाशयात आढळला मृतावस्थेतील बिबट्या
कोठा, किन्ही या गावच्या काही मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना १४ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास मृतावस्थेतील बिबट्या पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांनी सदरील घटना किन्हीचे सरपंच व पोलीस पाटील यांना कळविली. त्यानंतर ही माहिती वन विभागाचे अधिकारी आणि बामणी पोलीस यांना देण्यात आली. सायंकाळच्या सुमारास वन विभागाचे परभणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयसिंग कच्छवे, वनपाल गणेश घुगे, भंडारे, बामणी पोलीस ठाण्याचे अधिकारी गव्हाणे, किन्हीचे सरपंच वाकले, आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याला पाण्याच्या बाहेर काढले. सदरील बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे निश्चित कारण सांगता येईल, असे वन विभागाचे अधिकारी कच्छवे यांनी सांगितले. दरम्यान, या भागात मागे एक-दोन वेळा बिबट्या आढळून आला होता. मात्र, तो वन विभागाच्या हाती लागला नव्हता. या वेळेला बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.