अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचा दीड कोटींचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:17 IST2021-03-08T04:17:27+5:302021-03-08T04:17:27+5:30

परभणी : येथील अर्थो रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या अद्ययावत शस्त्रक्रियागृहासाठी प्राप्त झालेला १ कोटी ५० ...

Up-to-date operating surgery fund of Rs 1.5 crore | अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचा दीड कोटींचा निधी पडून

अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचा दीड कोटींचा निधी पडून

परभणी : येथील अर्थो रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या अद्ययावत शस्त्रक्रियागृहासाठी प्राप्त झालेला १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मागील वर्षभरापासून पडून आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियागृह नसल्याने या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड होत आहे.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र अर्थो रुग्णालय काही वर्षांपूर्वी कार्यरत करण्यात आले. या रुग्णालयात हाडांच्या आजारावरील तसेच अपघातातील रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी वर्षभरापूर्वी दोन शस्त्रक्रियागृह मंजूर करण्यात आले. त्यासाठी २ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून एका शस्त्रक्रियागृहाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या शस्त्रक्रियागृहाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या २ कोटी ७१ लाख रुपयांपैकी १ कोटी ५० लाख रुपये मागील वर्षभरापासून पडून आहेत. विशेष म्हणजे, अर्थो रुग्णालयात एक शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले असले तरी त्याचा वापर अजूनही सुरू नाही. त्यामुळे या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पर्यायी शस्त्रक्रियागृह शोधावे लागत आहे. मागील चार दिवसांपासून रुग्णालयात शस्त्रक्रियागृहाअभावी एकही शस्त्रक्रिया झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे निधी उपलब्ध असतानाही सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.

दररोज आठ शस्त्रक्रिया

येथील अर्थो रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी दररोज सरासरी आठ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. अर्थो रुग्णालयात शस्त्रक्रियागृह नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील किंवा स्त्री रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचा वापर केला जातो. मात्र, चार दिवसांपासून एकही शस्त्रक्रियागृह उपलब्ध होत नसल्याने अर्थो रुग्णालयातील शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत.

रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीस फाटा

जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या तसेच प्रशासनासमोर निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला रुग्ण कल्याण समितीची बैठक घेऊन त्यात निर्णय घेतले जातात. मात्र, येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीची बैठक मागील वर्षभरापासून झाली नाही. त्यामुळे या समस्या नेमक्या कोणापुढे मांडाव्यात, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Up-to-date operating surgery fund of Rs 1.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.