पालकांना शाळेत पुस्तके परत करण्यास संचारबंदीचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:22+5:302021-05-13T04:17:22+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. गेल्या शैक्षणिक वर्षातही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ...

पालकांना शाळेत पुस्तके परत करण्यास संचारबंदीचा अडथळा
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्यावतीने दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. गेल्या शैक्षणिक वर्षातही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली होती. गतवर्षी कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होऊ शकले नाही. असे असले तरी नवीन पुस्तकांची मागणी नोंदविण्यापूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांना दिलेली पुस्तके परत घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. जिल्ह्यात कोरोनामुळे दीड महिन्यापासून संचारबंदी आहे. त्यामुळे पालकांकडून ही पुस्तके कशी परत घ्यावी, या संभ्रमात जिल्ह्यातील अधिकाऱी आहेत. शिवाय काही पुस्तके परत आली, तरी ती वितरित करण्यावरून वाद होण्याची भीती आहे.
पालक म्हणतात...
सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, तसेच प्रशासनाचे संचारबंदीचे आदेश असताना, घराबाहेर कसे पडणार? कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळेला निश्चितच सर्व पुस्तके परत करणार आहे. कारण नवीन शैक्षणिक वर्षातील पुस्तकांची गरज लागणार आहे.
- विजय सोनवणे, परभणी
गेल्यावर्षी मुलाला शाळेतून पुस्तके मिळाली. मुलगा पुढील वर्गात गेला आहे. त्यामुळे ही पुस्तके परत करायची आहेत; सध्या बाहेरील वातावरण घोकादायक आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे जिकिरीचे आहे. कोरोना कमी झाला की सर्व पुस्तके शाळेला परत देणार आहे.
- ज्ञानेश्वर दळवे, सोनपेठ
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीची पुस्तके परत करण्याचा आमचा मानस असला,तरी ही पुस्तके द्यायची कुठे? हा प्रश्न आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ही पुस्तके परत देणार आहोत. कारण ती इतर गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणार आहेत.
- परमेश्वर पैंजणे, सोनपेठ