जिल्ह्यात आता १ जूनपर्यंत संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:24+5:302021-05-17T04:15:24+5:30
परभणी : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीत १ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय घेत असतानाच किराणा ...

जिल्ह्यात आता १ जूनपर्यंत संचारबंदी
परभणी : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यातील संचारबंदीत १ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय घेत असतानाच किराणा दुकाने आणि भाजीपाला व फळ विक्रीच्या दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरला असून, हा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार १५ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. रविवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला आहे. या संचारबंदीत १ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा आदेश काढत असताना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी किराणा दुकाने व भाजीपाला व फळ विक्रीच्या दुकानांना मात्र चार तासांची सूट दिली आहे. त्यानुसार दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बँकांमधील ग्राहकांसाठीची सेवा नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहतील. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे १ जूनपर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे. मात्र, त्यातच किराणा व भाजीपाला दुकानांना सूट दिल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या आस्थापनांना दिली सूट
१ जूनपर्यंत लावलेल्या संचारबंदी काळात कृषी निविष्ठा, रासायनिक खते, औषधे, बियाणे, शेती अवजारे व शेतीशी निगडित अस्थापना, दुकाने, गोदामे, कृषी उत्पन्न बाजार समिती, अडत बाजार यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाविषयक वैद्यकीय सेवा, सहायभूत सेवा देणाऱ्या अस्थापना आठवड्याच्या सर्व दिवस पूर्णवेळ सुरू राहतील. तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालय, अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, पेट्रोल पंप व गॅस वितरक कर्मचारी, त्यांची वाहने, कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती, लसीकरणासाठी जाणाऱ्या व्यक्ती, आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या व्यक्ती, स्वस्त धान्य दुकाने, ई-कॉमर्स सेवा व औद्योगिक कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांना या संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.