संचारबंदी पायदळी तुडवत मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST2021-04-16T04:16:15+5:302021-04-16T04:16:15+5:30
परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला ...

संचारबंदी पायदळी तुडवत मुक्तसंचार
परभणी; : जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने धास्तीचे चित्र निर्माण केले असले तरी परभणीत मात्र नागरिकांना कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा विसर पडला असून, शासनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन करत बिनधास्तपणे शहरात वर्दळ सुरू ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाची संचारबंदी पुन्हा एकदा दुकान बंद ठरली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १५ एप्रिलपासून कडकडीत बंद राहील आणि रस्त्यांवर शुकशुकाट निर्माण होईल, अशी धारणा झाली होती; परंतु सकाळपासूनच गर्दीचे चित्र शहरात दिसून येत आहे. सर्वच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच वाहतूक आहे. त्यामुळे संचारबंदीचा पार बोजवारा उडाल्याचे दिसून आले.
काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने निर्बंधांचा हा मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी मात्र या निर्णयाला अजूनही गांभीर्याने घेतले नाही. शहरात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असून मृत्यूचे प्रमाण वाढत असताना निष्काळजीपणा करीत अनेक नागरिक रस्त्यांवर उतरत आहेत. नागरिकांच्या या मुक्तसंचारामुळे प्रशासनाने निर्बंध लावले, तो हेतूच साध्य होत नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून देखील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिवसभरात झाले नाहीत. शिवाजी चौक आणि इतर मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असला तरी एकाही नागरिकाला तो घराबाहेर का पडला? हे विचारण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासणी झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे मनोबल आणखीच वाढत असून, दिवसभर शहरातील सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक पाहावयास मिळाली. संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, थोडीसे कठोर होऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता होत आहे.
सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत
गुरुवारी सकाळपासून शहरातील रस्त्यांवर वाढलेली वाहतूक पाहता शहरातील सर्वच नागरिक अत्यावश्यक सेवेत मोडतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासनाने काही जणांनाच अत्यावश्यक सेवेसाठी शहरात फिरण्याची मुभा दिली आहे; परंतु असे असतानाही शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने यावर निर्बंध घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
बाजारपेठेतील उलाढाल ठप्प
संचारबंदीमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणेच नागरिक सर्व व्यवहार करीत होते. रस्ते वाहतुकीने फुल्ल होते; परंतु या संचारबंदीचा व्यावसायिकांवर मात्र मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.