बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:39+5:302021-04-15T04:16:39+5:30
शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी शहरातील रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी कमी झाली नाही. ...

बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी
परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी शहरातील रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी कमी झाली नाही. नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असून, दिवसभर रस्त्यावर वाहतूक राहते. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे ठप्प झाली विकास कामे
परभणी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विकासकामे ठप्प आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात नियोजन समितीचा निधी विकासकामांसाठी वितरित करण्यात आला. मात्र, जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, इमारत बांधकाम, मूलभूत सुविधांची कामे सध्या ठप्प आहेत.
स्कूल व्हॅन चालकांवर उपासमारीची वेळ
परभणी : जिल्ह्यातील शाळा मागील वर्षीपासून बंद आहेत. त्या अद्यापपर्यंत सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांचा व्यवसाय ठप्प आहे. या व्यावसायिकांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता अन्य व्यवसाय शोधावा लागत आहे. राज्य शासनाने या व्यावसायिकांनाही मदत करावी, अशी मागणी होत आहे.
कलावंतांची आर्थिक कोंडी सुटेना
परभणी : कोरोना संसर्गामुळे सातत्याने संचारबंदी व निर्बंध लावले जात असल्याने जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. त्याचा परिणाम कलावंतांच्या रोजगारावर झाला आहे. प्रबोधनाच्या कार्यक्रमांतून कलावंतांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, हे कार्यक्रम बंद असल्याने कलावंतांची उपासमार होत आहे. कलावंतांसाठी शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानकात ऑटो चालकांची गर्दी
परभणी : जिल्ह्यात रेल्वेवाहतूक सुरू असून, रेल्वेने शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून ऑटोरिक्षा चालकांना व्यवसाय प्राप्त होतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळावेत, यासाठी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच ऑटोरिक्षा चालक गराडा घालत आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.