६५ हजार हेक्टरवरील पिके बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:56+5:302021-07-16T04:13:56+5:30
परभणी : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे सहा तालुक्यातील सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ...

६५ हजार हेक्टरवरील पिके बाधित
परभणी : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे सहा तालुक्यातील सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, वाढीस लागलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून, त्यात किती शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीसाठी पात्र ठरविले जाते, याकडे लक्ष लागले आहे.
दोन आठवड्यापूर्वी पाऊस गायब झाल्याने पिके संकटात होती. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र पावसाने जोरदार कमबॅक केले. मागील आठवड्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. रविवारी परभणी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २३८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेतली आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पोखर्णी, सुरपिंपरी, तरोडा, ब्राह्मणगाव, असोला, राहाटी, सिंगणापूर आदी गावांतील शेत शिवारांत पाणीच पाणी झाले. त्यानंतर सलग चार दिवस पाऊस होत राहिला. ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने पुराच्या पाण्यात कोवळी पिके वाहून गेली. तालुक्यातील सुमारे सात हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.
बुधवारी रात्री जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पालम, सेलू तालुक्यातील कुपटा, गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, पूर्णा तालुक्यातील पूर्णा, चुडावा, ताडकळस या मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचे पाणी शेतजमिनीत साचल्याने तसेच ओढे आणि नद्यांना पूर आला. पुराच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली.
जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही दोन प्रमुख पिके आहेत. नगदी पिके म्हणून या पिकांकडे पाहिले जाते. अतिवृष्टीच्या तडाख्यात या दोन्ही पिकांचे अनेक भागात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना आता नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे.
विमा कंपनीकडे कराव्यात तक्रारी
जिल्ह्यातील विम्याचे काम रिलायन्स विमा कंपनीला दिले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता, अशा शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो काढून क्रॉप इन या ॲपवर नोट कॅमवर फोटो काढून तक्रार दाखल केल्या जात आहेत. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कंपनीच्या कार्यालयात तक्रारी दाखल केल्या जात आहेत.
पंचनामाच्या अहवालाकडे लक्ष
जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक गावात जाऊन नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र बाधित असल्यास शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात झालेले अंदाजित नुकसान
तालुका सोयाबीन कापूस व इतर पिके
परभणी ५००० २०००
सोनपेठ ४००० ५०००
पालम ७००० ३०००
गंगाखेड ३००० २०००
जिंतूर ४००० ६०००
पूर्णा १२,००० ११,०००