१२१३ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:54+5:302021-05-15T04:16:54+5:30
मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामातील पिकांमधून उत्पन्न हाती ...

१२१३ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट
मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामातील पिकांमधून उत्पन्न हाती लागले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच खरीप हंगामाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. या खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. कोरोना महामारी मुळे ग्रामीण भागात उसनवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक कर्जाकडे लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जवळपास ४ हजार शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप काही बँकांनी केले आहे. त्यामुळे यावर्षी सर्व बाजूनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत व पेरणी पुर्वी बँकांनी पीक कर्ज वाटप करून वेळेत पैसा उपलब्ध करून दिला तर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सोयीचे होणार आहे.
दोन ते तीन वर्षापासून उद्दिष्ट होईना पूर्ण
जिल्हा प्रशासनाने बँकांना खरीप हंगामात दिलेले पीककर्जाचे उद्दिष्ट मागील दोन ते तीन वर्षापासून बँकांकडून पूर्ण करण्यात येत नाही.कधीी ६० टक्के तर कधी ५० टक्क्यांवर पीक कर्ज वाटप थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकाराला सह उसनवारी करून आपली पेरणी पूर्ण करावी लागली. त्यामुळे चहूबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान यावर्षी तरी बँकांकडून वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सहारा मिळेल, अशी अपेक्षा बळीराजा कडून व्यक्त होत आहे.
रब्बीसाठी ४१६ कोटींचे नियोजन
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी खरीप हंगामात १२१३ कोटी तर रब्बी हंगामासाठी ४१६ कोटी नियोजन केले आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील खरीप व रब्बी हंगामात एकूण १६२० कोटी रुपयांचा पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.