मनोविकार विभागाकडून २२०० रुग्णांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:21+5:302021-02-05T06:06:21+5:30
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात १८०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांची योग्य काळजी ...

मनोविकार विभागाकडून २२०० रुग्णांचे समुपदेशन
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात १८०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांची योग्य काळजी घेतल्याने त्यापैकी एकासही कोरोनाचा संसर्ग झाला नाही. दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग झाल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या सुमारे २२०० रुग्णांचे समुपदेशन करीत त्यांना मानसिक बळ देण्याचे काम मनोविकार विभागातून करण्यात आले आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकार विभागातील पथकाच्या वतीने मानसिक आजाराच्या रुग्णांवर उपचार केले जातात. मागील वर्षी जानेवारी महिन्यात विभागाकडे सुमारे १८०० रुग्णांची नोंद होती. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मात्र मनोविकार असलेल्या रुग्णांना या संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी वेळीच काळजी घेण्यात आली. या रुग्णांसाठी दोन ते तीन महिन्यांची औषधी देण्यात आली. त्यामुळे मनोविकार असलेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला नाही, असे मनोविकृती चिकित्सक अमरदीप घाटगे यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गकाळात रुग्णांची मानसिक स्थिती खालावल्याच्या तक्रारी होत्या. कोरोनाची भीती मनात असल्याने या रुग्णांना मानसिक बळ देण्याची गरज निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण सात हजार ८५६ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी साधारणत: २२०० ते २३०० रुग्णांचे समुपदेशन करीत त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. ज्या रुग्णांना मनोविकाराच्या संदर्भाने औषधोपचाराची आवश्यकता होती, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ.तारेख अन्सारी, मनोविकृती चिकित्सक अमरदीप घाटगे, प्रशांत पतंगे, लेमाडे, विनोद राठोड यांच्या पथकाने कोरोना संसर्गाच्या काळात मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले आहे.
कोरोनानंतरही समुपदेशन
येथील जिल्हा रुग्णालयातील मनोविकार विभागाच्या वतीने कोरोनाकाळात रुग्णांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर कोरोनातून रुग्ण मुक्त झाल्यानंतरही त्याचे समुपदेशन केले जाते. कोरोनाच्या संसर्ग काळात ३०० ते ४०० रुग्णांची संख्या होती. मात्र ती काही काळानंतर सरासरी दररोज ३७ ते ३८ रुग्णांवर येऊन ठेपली.
जानेवारी महिन्यातील रुग्ण
१८००
सध्या दवाखान्यात उपचार घेत असलेले रुग्ण
४