घंटागाडीतून हलविला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:16+5:302021-07-15T04:14:16+5:30
गंगाखेड : शहरात प्लास्टिक वेचणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून रुग्णालयात हलविल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ...

घंटागाडीतून हलविला मृतदेह
गंगाखेड : शहरात प्लास्टिक वेचणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन करणाऱ्या वाहनातून रुग्णालयात हलविल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
प्लास्टिक बाटल्या वेचून उदरनिर्वाह भागविणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड-पुणे महामार्गावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर १४ जुलै रोजी घडली. ही माहिती समजताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळापासून साधारणत: १०० मीटर अंतरावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात हा मृतदेह न्यायचा होता. त्यासाठी गंगाखेड नगर परिषदेच्या घंटागाडीला पाचारण करण्यात आले. कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीत मृतदेह टाकून उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात दाखल केला. याप्रकरणी जमादार दीपक भारती यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे समजू शकले नाही. मात्र, या व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात नेताना कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीचा वापर केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.