CoronaVirus : परभणीत सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा; रस्त्यांवर अन् बँकेसमोर नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 01:06 PM2020-04-07T13:06:59+5:302020-04-07T13:08:39+5:30

संचारबंदी लागू केल्यापासून पहिले काही दिवस रस्त्यांवर असणाऱ्या परभणीकरांनी नंतर मात्र संचारबंदीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच आवश्यक व्यवहार केले.

CoronaVirus: Poor Social Distinction; Crowds of citizens on the streets and in front of the bank at Parabhani | CoronaVirus : परभणीत सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा; रस्त्यांवर अन् बँकेसमोर नागरिकांची गर्दी

CoronaVirus : परभणीत सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा; रस्त्यांवर अन् बँकेसमोर नागरिकांची गर्दी

Next
ठळक मुद्देजनधन खात्यात पैसे जमा झाल्याने गर्दी

परभणी :  संचारबंदीच्या नियमांचे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांगल्या पद्धतीने पालन करणाऱ्या परभणीकरांनी मंगळवारी मात्र या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन रस्त्यावर आणि बँकेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी आहे की नाही, असाच सवाल उपस्थित झाला.

जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यापासून पहिले काही दिवस रस्त्यांवर असणाऱ्या परभणीकरांनी नंतर मात्र संचारबंदीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच आवश्यक व्यवहार केले. भाजीपाला, औषधी दुकाने, किराणा दुकान आदी ठिकाणी याच वेळेत नागरिक साहित्य खरेदीसाठी येत होते. त्यामुळे परभणीकरांनी कोरोनाला हरविण्यासाठी एकजुटी दाखविल्याचा प्रत्यय आला होता. मंगळवारी मात्र शहरातील परिस्थिती वेगळी दिसून आली. सकाळी ७ नंतर दैनंदिन व्यवहार सुरू झाले. १० च्या नंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली.

सद्यस्थितीत जनधन योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आहेत. हे पैसे काढण्यासाठी शहरातील युनियन बँक, भारतीय स्टेट बँक, बडोदा बँक, आंध्रा बँक, महाराष्टÑ बँक आदी मुख्य रस्त्यावरील बँकांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बँकेमध्ये फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जात असला तरी बँकेच्या परिसरात सोशल डिस्टंसच्या नियमांचा बोजवारा ग्राहकांकडून उडविला जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या ग्राहकांना या नियमांची जाणिव करुन देणारेही कोणी नव्हते. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराप्रमाणे हे नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करुन व अनेक नागरिक तोंडाला मास्क न लावताच उभे होते.

याशिवाय शहरातील रस्त्यांवरही दुपारी १२.३० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच पायी चालणारे नागरिक क्षुल्लक कारणासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. शहरातील शनि मंदिर  परिसरात मात्र सहायक पोलीस अधिक्षक नितीन बगाटे हे स्वत:च अनावश्यक फिरणाºया वाहनधारकांवर कारवाई करताना दिसून आले.  तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातही पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. इतर भागात मात्र पोलीस यंत्रणा रस्त्यावर दिसून आली नाही. त्यामुळे मंगळवारी शहरात संचारबंदी आहे की नाही, अशीच परिस्थिती दुपारपर्यंत  पाहवयास मिळाली.

Web Title: CoronaVirus: Poor Social Distinction; Crowds of citizens on the streets and in front of the bank at Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.