कोरोना योद्धे यांना पुन्हा ५० लाखांचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST2021-05-15T04:16:43+5:302021-05-15T04:16:43+5:30
कोरोना कालावधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने २८ मार्च २०२० पासून विमा लागू ...

कोरोना योद्धे यांना पुन्हा ५० लाखांचे कवच
कोरोना कालावधीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने २८ मार्च २०२० पासून विमा लागू केला होता. राज्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र हा विमा लागू नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने गतवर्षी २९ मे २०२० रोजी एक आदेश काढून कोरोना कालावधीत कर्तव्यावर असलेले आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कर्मचारी त्यात पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागरे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा, घरोघरी सर्वेक्षण करणारे कर्मचारी आदी कोविड उपाययोजनांशी संबंधित काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने कर्तव्यावर असलेल्या अशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे यात कंत्राटी किंवा बाह्यस्रोताद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही मदतही देण्यात आली आहे. या आदेशास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नंतरच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने या निर्णयास मुदतवाढ देण्यात आली नव्हती;परंतु आता कोरोनाचा पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १ जानेवारीपासून ३० जूनपर्यंत या आदेशाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कोरोना योद्धे यांना पुन्हा एकदा विम्याचे कवच मिळाले आहे.