Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 14:41 IST2021-06-26T14:39:57+5:302021-06-26T14:41:59+5:30

Corona virus : राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona virus: Restrictions in Parbhani from Monday: Shops will remain open till 4; Closed on Saturdays and Sundays | Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच

Corona virus : परभणीत सोमवारपासून निर्बंध लागू: दुकाने चारपर्यंतच सुरू राहणार; शनिवार, रविवार बंदच

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दुध विक्री केंद्रे, दुध संकलन केंद्र, दुध वितरण केंद्र सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरू

परभणी: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्लस रूग्ण आढळून येत असल्याची बाब विचारात घेऊन राज्य शासनाच्या सूचनेनुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी काढले आहेत. यापुढे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेण्याचे आदेशित करण्यात आले आहे. (  Restrictions in Parbhani from Monday ) 

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमालीची घटली असली तरी डेल्टा प्लसचे रूग्ण राज्यात विविध ठिकाणी आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाने परभणी जिल्ह्याचा तिसऱ्या गटात समावेश केला आहे. परिणामी कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी याबाबत आदेश काढला आहे. 

त्यानुसार २८ जूनपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार व रविवार ही दुकाने बंद राहतील. रेस्टॉरंट पाच दिवस ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. सुट्टीच्या दिवशी फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्याची परवानगी आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरण्यास सकाळी ५ ते ९ पर्यंतच परवानगी राहणार आहे. शासकीय कार्यालयासहीत इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थिती ५० टक्केच सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, विविध बैठका, सभा यांना ५० टक्के क्षमतेसह परवानगी आहे. लग्न संमारंभास फक्त ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असून अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी आहे. 

कृषी व कृषी पुरक सेवा आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर यांना ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच खासगी ट्रॅव्हल्स यांना ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिनेमा गृह व नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश आहेत. खेळाची मैदाने पाच दिवस सकाळी ५ ते९ पर्यंत आणि सायंकाळी ६ ते ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शनिवार व रविवार ही मैदाने बंद राहणार आहेत. त्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सुविधा आहे, त्या ठिकाणची बांधकामे दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ५ ते सकाळी ६ पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नियमित काय सुरू...
सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दुध विक्री केंद्रे, दुध संकलन केंद्र, दुध वितरण केंद्र सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसेच खासगी वाहने, टॅक्सी, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांना आंतरजिल्हा प्रवेश यास परवानगी आहे; परंतु स्तर पाच मधून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना इ-पास बंधनकारक राहणार आहे. कोविड नियमांचे पालन करून एमआयडीसी पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Web Title: Corona virus: Restrictions in Parbhani from Monday: Shops will remain open till 4; Closed on Saturdays and Sundays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.