corona virus : कोरोना नियम 'स्वाहा'; मृत्यूपश्चात विधीसाठी गंगाखेडमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 17:33 IST2021-05-21T17:32:16+5:302021-05-21T17:33:38+5:30
corona virus : गोदावरी काठावर दशक्रीयाविधीसाठी दि.१५ एप्रिलपासून नगरपालिकेने प्रतिबंध घातलेला आहे.

corona virus : कोरोना नियम 'स्वाहा'; मृत्यूपश्चात विधीसाठी गंगाखेडमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईकांची गर्दी
गंगाखेड (परभणी ) : गोदावरी काठावरील गंगाखेड शहरास प्रतिदक्षीण काशी म्हणून ओळखले जाते. मृत्यूपश्चात करण्यात येणारे विविध विधी, दशक्रीया विधीसाठी महाराष्ट्रासह परराज्यातुन मृतांचे नातेवाईक गंगाखेड येथे येतात. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंर्तगत गोदावरी काठावर दशक्रीयाविधीसाठी दि.१५ एप्रिलपासून नगरपालिकेने प्रतिबंध घातलेला आहे. असे असतानाही कोरोना नियम डावलून महाराष्ट्रासह परराज्यातून येथे दशक्रीया करण्यासाठी मृतांचे नातेवाईक दररोज मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र आहे. बाहेरील नागरिकांची वर्दळ वाढल्याने शहरात कोरोनाच्या भितीचे सावट कायम आहे.
काशी, पैठणपाठोपाठ गंगाखेड शहराला धार्मिकदृष्टीने प्राचीन काळापासून विशेष महत्व आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील वैष्णव घाट,नृसिह घाटावर होणारे दशक्रीया बंद आहेत. मात्र , काहीजण कोरोना नियम डावलून येथे दशक्रिया विधीसाठी येत आहेत. गोदावरी काठच्या आडवळणाच्या ठिकाणी हे विधी उरकल्या जात आहेत. गोदावरी नदी रेल्वेपूल परीसर, कुबद्याढव, खळी पुलाच्या परिसरात दशक्रीया विधी होत आहेत. यात महाराष्ट्रासह, परराज्यातून नागरिकांची मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे, बाहेरून आलेले मृतांचे नातेवाईक येथील बाजारपेठेत जात आहेत. यामुळे शहरात कोरोना पसरण्याचा धोका आहे. नियमांची कडक अंमलबजावणी करून येथील विधी बंद करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.