Corona Virus : परभणीत तीन दिवसांसाठी सर्व दुकानांना परवानगी; २४ तासात बदलले संचारबंदीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 20:14 IST2021-06-01T20:13:33+5:302021-06-01T20:14:03+5:30

परभणी जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे १ जून पासून संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती.

Corona Virus: All shops allowed in Parbhani for three days; Curfew order changed in 24 hours | Corona Virus : परभणीत तीन दिवसांसाठी सर्व दुकानांना परवानगी; २४ तासात बदलले संचारबंदीचे आदेश

Corona Virus : परभणीत तीन दिवसांसाठी सर्व दुकानांना परवानगी; २४ तासात बदलले संचारबंदीचे आदेश

परभणी : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर २४ तासात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आले असून, ४ जूनपर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात ३१ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कमी आहे, अशा जिल्ह्यात सूट देण्याचे निर्देश राज्य स्तरावरून दिले होते. परभणी जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे १ जून पासून संपूर्ण बाजारपेठ सुरू होईल, अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र ३१ मे रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अत्यावश्यक सेवेतील किराणा आणि भाजीपाला वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. १ जून रोजी विविध लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली.
लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांचा पाठपुरावा व सध्याची व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवे आदेश काढले. सर्व आवश्यक गटात समावेश नसलेली इतर दुकाने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत झाले असून, त्यानुसार २ ते ४ जून या तीन दिवसांसाठी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवश्यक गटात समावेश नसलेले इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे. शनिवार व रविवार रोजी ही दुकाने बंद राहतील. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांना किमान तीन दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.

Web Title: Corona Virus: All shops allowed in Parbhani for three days; Curfew order changed in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.