परभणी : जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाच्या ६ रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. मागील आठवडाभरापासून रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत आहे. नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वतःहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ३ एप्रिल रोजी आरोग्य विभागाला २ हजार ९४३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ६२५ अहवालांमध्ये ३४९ आणि रॅपिड टेस्टच्या १ हजार ३१८ अहवालांमध्ये १७८ जण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. तर शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे ५ पुरुष आणि खासगी रुग्णालयातील १ महिला अशा ६ जणांचा शनिवारी मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी २७० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ हजार ७५१ रुग्ण संख्या झाली असून, १२ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २ हजार ८३२ रुग्ण उपचार घेत आहेत. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर खाजगी रुग्णालयात २९५ रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २ हजार २७९ एवढी आहे.