कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षीही मूर्तिकारांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:41+5:302021-07-27T04:18:41+5:30
पूर्णा शहर व परिसरात मूर्तिकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान शहरातून दरवर्षी विना रंगकाम केलेल्या व तयार मूर्तींना ...

कोरोनाचा सलग दुसऱ्या वर्षीही मूर्तिकारांना फटका
पूर्णा शहर व परिसरात मूर्तिकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान शहरातून दरवर्षी विना रंगकाम केलेल्या व तयार मूर्तींना आंध्रप्रदेशमधील हैद्राबाद, सिकंदराबाद, कामारेडी, निझामाबाद या भागात मोठी मागणी आहे. मूर्ती निर्माण कार्य जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच सुरू होते. गतवर्षी कोरोना महामारीत बाहेर राज्यात मूर्ती पोहोचल्या नसल्याने स्थानिक कारागिरांचे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले. दुसरीकडे शासनाने चार फुटापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बसवण्यास बंदी घातली असल्याने यंदा मोठ्या मूर्तींची निर्मिती बंद आहे. सद्याही कोरोना प्रतिबंध नियम पूर्णपणे शिथिल नसल्याने निर्मितीपासून ते विक्री पर्यंतच्या प्रक्रियांना अडचणी येत आहेत. मूर्तिकार विजय तोलाजी पिल्लई व बंधू सचिन पिल्लई हे या व्यवसायात अनेक वर्षांपासून आहेत. त्यांनी तयार केलेल्या मूर्तींना तालुक्यात मोठी मागणी असते. कोरोनाने सलग दुसऱ्या वर्षीही ह्या व्यवसायाला फटका बसला असून मूर्ती निर्मितीसाठी प्लास्टर बंदीचा नियम हा त्वरित उठवण्यात यावा. पूर्णा शहरात गतवर्षी आपण ६ इंच ते अडीच फूट उंचीच्या ३ हजार मूर्ती निर्माण केल्या होत्या. परंतु, मागील वर्षी या मूर्तींची विक्री झालीच नाही. यावर्षी निर्मिती कार्य निम्म्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवापूर्वी पोळा व गौरीच्या मूर्तींची निर्मितीही सुरू झाली आहे. कच्चा माल व मजुरीत वाढ झाल्याने यावर्षी मूर्तींच्या किमतीत कमालीची वाढ दिसणार आहे.