कोरोना विघ्न दूर करण्याचे गणरायाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:35+5:302021-09-11T04:19:35+5:30
सजावट साहित्यासह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली सकाळपासूनच नागरिकांचा गणेष मूर्ती खरेदीसाठी उत्साह ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त परभणी : कोरोनाची ...

कोरोना विघ्न दूर करण्याचे गणरायाला साकडे
सजावट साहित्यासह पूजेच्या साहित्याची दुकाने सजली
सकाळपासूनच नागरिकांचा गणेष मूर्ती खरेदीसाठी उत्साह
ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
परभणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. या निर्बंधाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यानुसार परभणीकरांनी सुध्दा साध्या पद्धतीने व उत्साहात गणरायाचे स्वागत केले. तसेच गणरायाकडे कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे नागरिकांनी घातले.
यंदा कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी नाही. मात्र, घरोघरी प्रतिष्ठापणा केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून गजबजल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत गणपतीच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिक लहान मुलांसह बाजारपेठेत दाखल झाले होते. शहरातील अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, क्रांती चौक यासह शिवाजी चौकापर्यंत सर्व रस्ते गर्दीने गजबजून गेले होते. दिवसभर या मार्गावर पायी चालण्यासाठीही जागा उपलब्ध नव्हती.
लहान मुलांनी धरला ठेका
क्रांती चोक, गांधी पार्क भागात सकाळपासूनच विविध दुकानांवर गणपतीच्या मुर्तीची खरेदी केली जात होती. यात रत्नागिरी, रायगड, पेण या भागातून काही मुर्ती विक्रेत्यांनी गणरायाच्या मुर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. लहान मुलांनी पालकांसोबत गणरायाची मुर्ती खरेदी करण्यासाठी येथे गर्दी केली होती. काही मुलांनी एकत्र येत गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाच्या निनादात गणरायाची मुर्ती छोटे बँड लावून सायकल रिक्षातून घराकडे नेल्या. या मुलांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.
मोठ्या उंचीच्या मुर्ती यंदा कमी
सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षी परवानगी दिली नसल्याने विक्रेत्यांनी सुध्दा उंचीने लहान असलेल्या सुबक अशा मुर्ती तयार केल्या आहेत. असे असले तरी मागील वर्षीपेक्षा यावर्षी लहान मुर्तींचे दर सुध्दा वाढले होते. साधारण १५१ रुपयापासून यंदा गणेश मुर्ती उपलब्ध होत्या.
लक्ष्मीच्या सणामुळे वाढली गर्दी
क्रांती चौक, गांधी पार्क तसेच अन्य भागात गणपती व महालक्ष्मीसाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावट साहित्य, मखर, मुखवटे यांची दुकाने थाटली आहेत. शुक्रवारी गणेश चतुर्थी तर रविवारी महालक्ष्मीच्या आगमनामुळे महिला वर्गांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
पोलिसांची फिरती गस्त
अष्टभूजा देवी मंदिर ते शिवाजी चौक या रस्त्यावर दोन्ही मार्गाने क्यूआरटी पथक, वाहतूक शाखेचे पोलीस, होमगार्ड तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता. नानलपेठचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी या भागात दिवसभर लक्ष ठेऊन स्वत: गावातून फेरफटका मारला. यासह महिला पोलीस सुध्दा कार्यरत होत्या.