कोरोनाने जिल्ह्यातील १४५ बालकांचे पालकत्व हिरावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:23+5:302021-05-26T04:18:23+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

कोरोनाने जिल्ह्यातील १४५ बालकांचे पालकत्व हिरावले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच उपचार सुरू असताना कोरोनाबाधित व्यक्तिंचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात एकाच कुटुंबातील २ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा मृत्यू झाल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक कुटुंबातील बालके अनाथ झाली आहेत. शिवाय काही बालकांचे वडील कोरोनामुळे मरण पावले आहेत, तर काही बालके आईच्या मायेला पोरकी झाली आहेत, अशा बालकांची माहिती महिला व बालकल्याण विभागाने संकलित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२८ आणि शहरी भागातील १४ बालकांनी आई किंवा वडील गमावले आहेत. यात ९ बालकांच्या आईचा, तर १३६ बालकांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपयांची मदत
n कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी शासनाने बालसंगोपन योजनेंतर्गत दरमहा ११०० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
n या बालकांना पुरवठा विभागाकडून अंत्योदय योजनेंतर्गत रेशन दुकानातून मोफत धान्य देण्यात येणार आहे.
n तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेचा लाभ वडिलांचे छत्र हरविलेल्या बालकांच्या आईला मिळणार आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीला १७ दिवसांनंतर मुहूर्त
कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र गमावलेल्या बालकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील आदेश ७ मे रोजी राज्य शासनाने काढला होता. त्यानुसार इतर जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, यासंदर्भातील कामकाजही सुरू झाले आहे. परभणी जिल्ह्यात मात्र शासन आदेशानंतर तब्बल १७ दिवसांनी २४ मे रोजी टास्क फोर्स बैठकीला मुहूर्त लागला. या टास्क फोर्सचे सदस्य सचिव जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी असताना त्यांच्याकडे याबाबत सविस्तर माहितीच उपलब्ध नव्हती. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून दिली. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्हा याबाबत मागेच असल्याचे दिसून येत आहे.
या अनाथ मुलांचे सरकार काय करणार....
प्राथमिक स्वरूपात महिला व बालकल्याण विभागाला पालकत्व हरविलेल्या बालकांची माहिती मिळाली आहे.
त्यानंतर प्रशासन आता या बालकांची प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन माहिती घेणार आहे. त्यानंतर त्यांना जिल्हा टास्क फोर्सद्वारे मदत दिली जाणार आहे.
अनाथ झालेल्या बालकांना बालगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली.