कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:39 IST2021-09-02T04:39:09+5:302021-09-02T04:39:09+5:30
परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून ...

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या...
परभणी शहरात उच्चशिक्षित नियोजित वधू-वरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वधू-वरांचे विवाह जुळविण्यासाठी त्यांचे पालक अनेक ठिकाणी संपर्क साधून चांगले स्थळ कसे मिळेल, याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला हुशार जावई तसेच घरी जुळवून घेणारी सून मिळावी, याची अपेक्षा असते. पालकांसोबत वधू-वरांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी स्थळाची बोलणी, मग प्रत्यक्ष पाहणी या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कोरोनानंतर अनेकांच्या शिक्षण, नोकरी, पैसा या अपेक्षा कमी झाल्या आहेत तसेच मेट्रो सिटीतील जावयाच्या थाटापेक्षा एकत्रित कुटूंब पध्दतीतील वधू-वर मिळावेत, यासाठी तडजोड केली जात आहे.
या अपेक्षांची पडली भर
कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही जणांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशा स्थितीत पालक नोकरीपेक्षा मुला-मुलीच्या कुटुंबातील आर्थिक तसेच सामाजिक स्थिती पाहून लग्न जुळवित आहेत. शेती तसेच राहते घर व अन्य स्थावर-जंगम मालमत्ता पाहून लग्न जुळविले जात आहेत. यात वराची निवड करताना त्याचे शिक्षण तपासले जात आहे.
या अपेक्षा झाल्या कमी
वधूच्या बाबतीमध्ये शिक्षणाची अट न घालता आपल्या घरात सून म्हणून ती कशी घराला जुळवून घेऊ शकेल याचा विचार अनेक पालक व इच्छुक वर करीत आहेत. नोकरीपेक्षा घरातील स्थिती, एखादा व्यवसाय असला तरी त्यास पसंती दिली जात आहे. मेट्रो सिटीतील थाटबाट आता पाहिला जात नाही. जेथे घर आणि जी नोकरी असेल त्यात समाधानी राहून संसार करण्याचा विचार नियोजित वधू-वर आणि त्यांचे पालक करीत आहेत.
सोशल मिडीयावर नोंदणी वाढली
आता पूर्वीसारखे विवाह जुळविण्यासाठी मेळावे घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यात कोरोनाने तर हे मेळावे बंदच झाले आहेत. यामुळे पालक व नियोजित वधू-वर सोशल मिडीयावर विवाहासाठी नोंदणी करीत आहेत. यावर सर्व अपेक्षा जुळल्यानंतर एकदा पाहणी केली जात आहे. यामुळे विवाह सूचक मंडळ तसेच मध्यस्थी यांचे प्रमाण कमी झाले आहे.
वधू-वर सूचक मंडळ चालक म्हणतात...
मागील ११ वर्षापासून शहरात वधू-वर सूचक मंडळ चालवितो. यात ४० हजार जणांची नाव नोंदणी पूर्ण झाली आहे. मागील दीड वर्षात झटपट विवाह जुळविणे आणि लग्न पार पाडणे याची घाई पालकांसह वधू-वरांना झाली आहे. सध्या अनेकांच्या अपेक्षा कमी झाल्या आहेत. यामुळे लग्न जुळण्याचे प्रमाण वाढले आहे. - सचिद्दानंद कुलकर्णी.