पीएफचे खाते काढण्याला कंत्राटदारांनी दिला खो
By Admin | Updated: July 15, 2017 23:45 IST2017-07-15T23:40:24+5:302017-07-15T23:45:25+5:30
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या मजुरांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदारांनी उघडलेच नसल्याचा प्रकार समोर आला

पीएफचे खाते काढण्याला कंत्राटदारांनी दिला खो
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कंत्राटदारांमार्फत काम करणाऱ्या मजुरांचे भविष्य निर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदारांनी उघडलेच नसल्याचा प्रकार समोर आला असून, कंत्राटदारांची ही लपवाछपवी प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आता त्यांना ३१ आॅगस्टपर्यंत खाते उघडण्याची ताकीद देण्यात आली आहे़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनाने २४ जुलै २०१५ च्या निर्णयानुसार हंगामी स्वरुपात कामावर मजूर न लावता ती कामे कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार २०१५ मध्ये जवळपास ११५ कंत्राटदारांमार्फत कृषी विद्यापीठात मजुरांकडून काम करून घेण्यात आले तर २०१६ मध्ये ५४ कंत्राटदारांमार्फत कामे करून घेण्यात आली़ कामे करणाऱ्या प्रत्येक मजुराचे भविष्यनिर्वाह निधीचे खाते संबंधित कंत्राटदाराने उघडणे बंधनकारक आहे़ परंतु, गेल्या दोन वर्षांपासून या कंत्राटदारांनी एकाही मजुराचे भविष्यनिर्वाह निधीचे (पीएफ) खाते उघडलेले नाही़ त्यामुळे मजुरांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला नाही़ शिवाय त्या पैशाच्या माध्यमातून मिळणारे व्याजही या मजुरांना गमवावे लागले आहे़ या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने दोन वर्षापूर्वी संबंधित कंत्राटदारांना कामे करण्याच्या अनुषंगाने नियम व अटींची लेखी स्वरुपात माहिती दिली होती़ परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे प्रशासनाने पाहिले नाही़ परिणामी गेल्या दोन वर्षांपासून कंत्राटदारांनी पीएफचा निधी जमाच केला नाही़ ही बाब लक्षात आल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या यादीवरील सर्व कंत्राटदारांना त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे पीएफचे खाते ३१ आॅगस्टपर्यंत उघडण्याचे आदेश दिले आहेत़ असे खाते न उघडल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे़ असे असले तरी गेले दोन वर्षे या कंत्राटदारांनी बुडविलेल्या पैशांचे काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे़
दरम्यान, कृषी विद्यापीठात काही विभागांकडून तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे निविदा न काढताच ती कंत्राटदारांना देण्यात आली़ काही मोठ्या विभागांमध्ये जवळपास ५० मजूर दररोज कामाला असतात़ लाखो रुपयांचे हे काम असताना त्याच्या निविदा काढण्याची तसदी विद्यापीठाकडून घेतली गेलेली नाही़