उपजिल्हा रुग्णालयातील सेवेने रुग्णांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:37+5:302021-03-27T04:17:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवगावफाटा : सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे सेलूकरांना दर्जेदार आरोग्य ...

उपजिल्हा रुग्णालयातील सेवेने रुग्णांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा : सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या घेतल्या जाणाऱ्या काळजीमुळे सेलूकरांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याने त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सेलू शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात आंतररुग्ण व प्रसुती विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष देशमुख, डॉ. विजय गोरे, डॉ. प्रतिमा वंगलवाड, डॉ. कृष्णा पवार, कर्मचारी कोमल सोनवणे, सतीश कांबळे यांच्या माध्यमातून सात नाॅर्मल प्रसुती, ६ सिझर करण्यात आली. तसेच अन्य ९ रुग्ण या वार्डात दाखल होते. या रुग्णांना वेळेवर औषधोपचार देण्यात आले. स्वच्छतेच्या बाबतीतही या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसह सामान्य उपचारासाठी सेलूकरांना आता उपजिल्हा रुग्णालय जवळचे वाटू लागले आहे. त्यामुळे या रुग्णालयातून रेफरचे प्रमाण कमी झाले आहे.
कोरोना परिस्थितीत सेलू उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना आपले काम व वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी आत्मीयतेने आपल्या वेळेत रुग्णांना सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे येथील उपचारांबद्दल रुग्णांचा विश्वास वाढत आहे.
- डॉ. संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, सेलू