नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:44+5:302021-05-12T04:17:44+5:30

परभणी : कोरोना लसीकरणासाठी शहरातील महानगरपालिकेच्या खानापूर केंद्रांवर नियोजनाचा अभाव निर्माण झाल्याने ११ मे रोजी सकाळपासून गोंधळाची स्थिती निर्माण ...

Confusion at immunization center due to lack of planning | नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ

परभणी : कोरोना लसीकरणासाठी शहरातील महानगरपालिकेच्या खानापूर केंद्रांवर नियोजनाचा अभाव निर्माण झाल्याने ११ मे रोजी सकाळपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दुपारनंतर लसीकरण सुरळीत झाले.

जिल्ह्यात १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जात आहे. १८ ते ४४ या वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच लस उपलब्ध होते. जिल्ह्यातील अनेक नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेल्यानंतरही त्यांना लस उपलब्ध होत नसल्याने हे नागरिक लसीच्या प्रतीक्षेत होते. अखेर ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी मंगळवारी शहरातील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्र राबविण्यात आले. या लसीकरणासाठी कुठल्याही प्रकारची नोंदणी करावयाची नव्हती. त्यामुळे नागरिकांनी सकाळी सहा वाजेपासूनच केंद्रांवर रांगा लावल्या. येथील खानापूरनगर परिसरातील नागरी आरोग्य केंद्रात अनेक नागरिक सकाळी ६ वाजेपासून रांगेत होते. साडेनऊ वाजण्याच्यासुमारास लसीकरण सत्र सुरू झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. आपल्याला लस उपलब्ध व्हावी, यासाठी नागरिकांनी केंद्रासमोर मोठी गर्दी केली. यावेळी पोलीस बंदोबस्तही उपलब्ध नव्हता. या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसून आला. केंद्रावर गोंधळ वाढत असल्याने दुपारी साडेबारा वाजण्याच्यासुमारास पोलिसांना पाचारण करावे लागले. काही नगरसेवकांनी या ठिकाणी दाखल होऊन लसीकरणाचे नियोजन लावले. प्रत्येकाला टोकन दिल्यानंतर येथील लसीकरण सुरळीत सुरू झाले.

महानगरपालिकेच्या जायकवाडी, इनायतनगर, खंडोबा बाजार येथील लसीकरण केंद्रांवरही दिवसभर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. लसीचा साठा कमी असून, त्या तुलनेत लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

लसीचे २२ हजार ६०० डोस उपलब्ध

सोमवारी रात्री कोविशिल्डचे २२ हजार ६०० डोस प्राप्त झाल्याने मंगळवारी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. प्राप्त झालेली लस सर्व केंद्रांपर्यंत पोहोचती न झाल्याने दिवसभरात केवळ ७० केंद्रांवरही लसीकरण झाले. १३ हजार ९०० डोस ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी आणि ८ हजार ७०० डोस १८ ते ४५ वर्षे वयोगटासाठी वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, कोव्हॅक्सिनचे केवळ ८०० डोस प्राप्त झाले. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणादरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन वापरा

राज्य शासनाने खरेदी केलेली कोव्हॅक्सिन लस केवळ १८ ते ४४ या वयोगटासाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाला पत्र प्राप्त झाले असून, शिल्लक असलेली कोव्हॅक्सिनची लस ४५ वर्षांपुढील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तातडीने केंद्रांमध्ये बदल करून शहरात ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्याचे सत्र मंगळवारी राबविण्यात आले.

Web Title: Confusion at immunization center due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.