दिलासादायक; कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:36+5:302021-05-26T04:18:36+5:30
परभणी : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४६२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मागील दीड महिन्यापासून कोरोनाबाधित ...

दिलासादायक; कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू घटले
परभणी : जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४६२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मागील दीड महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची वाढलेली संख्या २५ मे रोजी कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, दररोज बाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू असल्याने चिंतेची लकेर कायम होती. मात्र, बुधवारी बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात १ आणि मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या दोन रुग्णांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्गही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. बुधवारी आरोग्य विभागाला ७ हजार ४५७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ७ हजार ५४ अहवालांमध्ये ४१८ आणि रॅपिड टेस्टच्या ४०८ अहवालांमध्ये ४४ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार २७१ झाली असून, त्यापैकी ४४ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २१२ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३ हजार ९८१ रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनामुक्तीचा घसरला दर
बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दररोज ४०० ते ५०० रुग्ण कोरोनामुक्त होत होते, पण सध्या ही संख्या शंभर ते दीडशे रुग्णांवर आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या अडीच हजारांपर्यंत कमी झाली होती. आता ही संख्या ३ हजार ९८१ झाली आहे.