ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST2021-04-23T04:19:06+5:302021-04-23T04:19:06+5:30
राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात ६० ...

ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हाधिकाऱ्यांची समिती
राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. फेब्रुवारीपासून राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. तसेच या रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची गरज भासत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उत्पादित होणारा एकूण ऑक्सिजन व सद्य:स्थितीत वैद्यकीय वापरासाठी लागणारा ऑक्सिजन याचा तुटवडा भासत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा मेडिकल ऑक्सिजन लक्षात घेता नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणी तातडीने करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन आदेश काढले आहेत. यामध्ये कोविडसाठी लागणारी जिल्हास्तरावरील तातडीची खरेदी ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ऑक्सिजन जनरेशन प्लांट जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन निधी, राज्य आपत्ती निवारण निधी व इतर जिल्हास्तरीय उपलब्ध निधीतून कोविड रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसविण्यास मान्यता देण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा होणारा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.