थंडीचा आनंद घेण्यासाठी आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; तापमान थेट ६.६ अंशांवर!

By मारोती जुंबडे | Updated: December 8, 2025 11:53 IST2025-12-08T11:39:56+5:302025-12-08T11:53:01+5:30

परभणीने 'थंडीत' महाबळेश्वरला मागे टाकले! दोन दिवसांपासून जिल्ह्यात 'हुडहुडी' कायम

Cold wreaks havoc in Parbhani, temperature surpasses Mahabaleshwar at 6.6 degrees! | थंडीचा आनंद घेण्यासाठी आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; तापमान थेट ६.६ अंशांवर!

थंडीचा आनंद घेण्यासाठी आता महाबळेश्वर सोडा, परभणीला चला; तापमान थेट ६.६ अंशांवर!

परभणी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा पाऱ्याचा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे टाकणारा ठरला असून परभणीकर अक्षरशः गारठून गेले आहेत.

शहरात पहाटेपासून दाट धुके पसरत आहे. रस्ते, इमारती, वाहनांचे काच, झाडे–झुडपे पांढऱ्या धुक्याच्या चादरीत गुरफटल्यासारखे दिसत आहेत. सकाळी ७ नंतरही दृष्यमानता मर्यादित असल्याने वाहनधारकांना विशेष काळजीपूर्वक प्रवास करावा लागत आहे. पहाटे  थंडीपासून बचाव करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. थंडीच्या लाटेमुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम जाणवतो आहे. बाजारपेठा उशिरा सुरू होत आहेत, तर सकाळच्या सत्रात चहाच्या टपऱ्या, गरम दूध विक्रेत्यांपाशी मोठी उलाढाल होताना दिसत आहे. सध्या नागरिक गरम कपडे, मफलर, शॉल, टोपी यांची खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात 'हुडहुडी' कायम
शनिवारपासूनच थंडीने जोर पकडला होता. त्यात रविवारी तापमान ८ अंशांवर आल्याने थंडीचा चटका वाढला. परंतु सोमवारी सकाळी ६.६ अंशांची नोंद झाल्याने थंडीची तीव्रता कमालीची वाढली. अचानक पडलेल्या गारठ्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारपण असलेले नागरिक अधिक त्रस्त झाले असून डॉक्टरांकडे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

रब्बी पिकांवर थंडीचा फटका
गेल्या आठवडाभरापासून तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. गहू, हरभरा, ज्वारी यासारख्या पिकांवर थंडीचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत ११.२ अंशांवर असलेला पारा अवघ्या दोन दिवसांत ५ अंशांनी खाली येणे ही चिंतेची बाब असल्याचे शेतकरी व्यक्त करतात.

परभणीचा पारा महाबळेश्वरलाही मागे टाकणारा
सामान्यतः महाबळेश्वर येथे डिसेंबर महिन्यात ७–८ अंश तापमानाची नोंद होते. मात्र सोमवारी परभणीचे तापमान ६.६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांमध्ये चर्चा रंगली. आता महाबळेश्वर सोडा, थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर परभणीला या, असे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील सात दिवसांतील तापमानातील मोठे चढ-उतार
दिवस    तापमान (अंश सेल्सिअस)

सोमवार    ८.४
मंगळवार    ९.८
बुधवार    ९
गुरुवार    ११
शुक्रवार    ११.२
शनिवार    ९
रविवार    ८
सोमवार    ६.६

Web Title : परभणी में ठंड का कहर, महाबलेश्वर से भी ज़्यादा ठंडा!

Web Summary : परभणी भीषण ठंड की चपेट में, तापमान 6.6 डिग्री सेल्सियस तक गिरा, महाबलेश्वर से भी ज़्यादा ठंडा। रबी फसलों पर असर, बाज़ार देर से खुल रहे हैं, और गर्म पेय पदार्थों की बिक्री बढ़ रही है।

Web Title : Parbhani shivers as temperature plummets, colder than Mahabaleshwar!

Web Summary : Parbhani reels under intense cold wave, dropping to 6.6°C, surpassing Mahabaleshwar. Daily life is disrupted, impacting Rabi crops and causing health issues, with markets opening late and hot beverage sales soaring.