युवकांच्या श्रमदानातून पुरातन बारव स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:18+5:302021-02-07T04:16:18+5:30
परभणी : ऐतिहासिक वारसा जतन करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली असून, या मोहिमेअंतर्गत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील युवकांनी पुढाकार ...

युवकांच्या श्रमदानातून पुरातन बारव स्वच्छ
परभणी : ऐतिहासिक वारसा जतन करण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली असून, या मोहिमेअंतर्गत गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातनू पुरातन बारव स्वच्छ केली आहे. त्यामुळे आता या बारवेत स्वच्छ पाण्याचा झरा वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पुरातन बारवांचे अस्तित्व आजही टिकून आहे. शिल्प कलेचा अजोड नमुना असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा ठरलेल्या या बारव दुर्लक्षित आहेत. शेकडो वर्षांपूर्वीची ही बांधकाम शैली आजही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात. या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन आणि अभ्यास करण्याचे काम जिल्हाधिधकारी दीपक मुगळकर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले आहे. याच अभियानानंतर्गत अभ्यास गटातील पथकाने राणीसावरगाव येथे जाऊन बारवेची पाहणी केली. तेव्हा काटेरी झुडपे आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी बारवाची चांगलीच दुरवस्था झाली होती. ही बारव स्वच्छ करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद युवकांनी श्रमदान केले.
दररोज युवकांनी स्वत: श्रमदान करत येथील पुरातन बारव स्वच्छ केली आहे. त्यामुळे कचरा आणि गाळापासून या बारवेने आता मुक्त श्वास घेतला आहे.
बारव बचाव अभियान
जिल्ह्यात स्वच्छ बारव अभियान राबिवले जात आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत जिंतूर तालुक्यातील पुंगळा,परभणी तालुक्यातील आर्वी, गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील बारवा साफ करण्यात आल्या. या बारवांमधील पाण्याच्या तपासणी केली जाणार आहे. अभ्यासगटाचे सदस्य गावातील पुरातन मंदिर, शिल्प, बारवा, जुणे वाडे यांची माहिती संकलित करीत असून हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांचे प्रबोधन करीत आहेत. त्याचाच हा दृश्य परिणाम समोर येत आहे. या कामी पथकातील मल्हारीकांत देशमुख, अनिल स्वामी, लक्ष्मीकांत सोनवटकर, डॉ.नितिन बावळे, डाॅ.सीमा नानवटे, अनिल बडगुजर, प्रल्हाद पवार, निळकंठ काळदाते, नागेश जोशी, वैजनाथ काळदाते यांचा पुढाकार आहे.