दहा दिवसांना मिळतेय शहरवासियांना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:00+5:302021-04-11T04:17:00+5:30
परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ ...

दहा दिवसांना मिळतेय शहरवासियांना पाणी
परभणी : शहरातील नागरिकांना पाणी वितरित करण्याचे नियोजन विस्कळीत झाले असून, अनेक भागात १० ते ११ दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मागील वर्षी येलदरी येथून नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र, ही योजना कार्यान्वित होण्यापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती यात फारसा फरक नाही. येलदरी जलाशयात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र ८ ते ११ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नाही. शहरातील विविध भागांमध्ये जलकुंभ उभारण्यात आले आहेत. नवीन व्हॉल्व्ह टाकले आहेत. परंतु, तरीही पाण्याचे नियोजन होत नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
कारेगाव रोड भागात १० दिवसानंतर शहरवासियांना पाणीपुरवठा झाला. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये ८ दिवसांतून एक वेळा पाणी उपलब्ध होत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून खासगी बोअर आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागते. परंतु, हे पाणी आठ दिवस मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी वितरणाचे नियोजन करून शहरवासियांना किमान ४ दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाणी वितरणासाठी खासगी कंत्राट
शहरातील नागरिकांना पाण्याचे वितरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच खासगी एजन्सीला कंत्राट दिले आहे. या एजन्सीने शहरातील व्हॉल्व्हची देखभाल करणे, पाण्याचे वितरण करणे आदी कामे करावयाची आहेत. त्याचप्रमाणे येलदरी ते धर्मापुरी या अंतरातील व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीची देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठीही एक एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. खासगी एजन्सीची नियुक्ती केल्यानंतरही शहराला मात्र सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जलकुंभ उभारल्यानंतरही परिस्थिती जैसे थे
येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला आहे. त्यामुळे ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरील पाणी वितरणाचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाल्याने ममता कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवरून या भागातील वसाहतींना ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, जलकुंभाची उभारणी झाल्यानंतरही या भागातील पाणी वितरणाची परिस्थिती जैसे थे आहे.