परभणीत खड्ड्यात बसून नागरिकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:31 IST2017-12-19T00:30:56+5:302017-12-19T00:31:13+5:30
तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले.

परभणीत खड्ड्यात बसून नागरिकांचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले.
सोनपेठ तालुक्यातील नागरिकांनी दोन वर्षापूर्वी रस्त्याच्या प्रश्नासाठी ५९ दिवस धरणे आंदोलन केले होते. परंतु, त्यावेळसही सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. परंतु, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, सर्व रस्ते खड्डेमुक्त करु, असे जाहीर केले होते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे वाटत होते. मात्र १५ डिसेंबरनंतरही सर्वच रस्त्यावर खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याने १८ डिसेंबर रोजी सोनपेठ शहरासह तालुक्यातील वाडी पिंपळगाव, शेळगाव, उक्कडगाव, लोहीग्राम, नरवाडी या सहा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सोनपेठ- गंगाखेड या रस्त्यावर भाऊचा तांडा पाटीजवळ खड्ड्यात बसून आंदोलन केले. या आंदोलनात सुधीर बिंदू, गणेश पाटील, गुलाबराव ढाकणे, माधव जाधव, रामप्रसाद यादव, मारोती रंजवे, अशोक तिरमले, सोमनाथ नागुरे, राधेशाम वर्मा, कृष्णा पिंगळे, सय्यद खदीर, रविंद्र देशमुख, सिद्धेश्वर गिरी, शिवमल्हार वाघे आदींचा सहभाग होता.