शहीदांच्या स्मृती जागविणारा चौक
By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-09T00:08:42+5:302014-08-09T00:29:21+5:30
परभणी: शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला

शहीदांच्या स्मृती जागविणारा चौक
परभणी: शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या क्रांती चौकात शहीदांच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला असून, हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण देतानाच नव्या पिढीला स्फुर्ती मिळत आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामात परभणी जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले. निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी त्याकाळी अनेकांनी कारावास भोगला. अनेकांनी भूमिगत राहून लढा दिला. स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. आर. बी. देशपांडे, मुकुंदराव पेडगावकर, मनोहरराव खेडकर, श्रीनिवासराव बोरीकर, गोविंदराव नानल अशी किती तरी नावे घेता येतील ज्यांनी या लढ्यासाठी आपले सर्वस्व दिले. शहरातील क्रांती चौकातूनच या स्वातंत्र्य सैनिकांची रणनीती ठरायची. याच ठिकाणी योजना आखल्या जायच्या. विशेष म्हणजे याच चौकात बैठका झाल्या आणि याच चौकातून अनेकांना कारावासही भोगावा लागला. माजी आ. आर. बी. देशपांडे यांना येथूनच कारावासात जावे लागले होते. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात क्रांती चौकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या या आठवणी जागृत ठेवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण, अण्णासाहेब गव्हाणे यांच्या उपस्थितीत १९७६ मध्ये या ठिकाणी स्मृतीस्तंभ उभारण्यात आला. भाजी मार्केट परिसरात हा स्मृती स्तंभ असल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. स्तंभाशेजारीच विक्रेते त्यांचे साहित्य ठेवत. त्यामुळे या स्मृती स्तंभाची अवहेलनाच होत होती. हा स्मृती स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलीदानाची आठवण करुन देणारा, क्रांतीच्या स्मृती तेवत ठेवणारा स्तंभ आहे. परंतु त्याच स्तंभाची दुरवस्था होत असल्याने येथील बालनाथ देशपांडे यांनी या चौकाचे आणि स्मृतीस्तंभाचे वैभव जपले जावे यासाठी एकाकी लढा दिला. शासन दरबारी या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुंबई येथील आयुक्तांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करुनही त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे बालनाथ देशपांडे यांनी स्तंभाच्या ठिकाणीच बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि उपोषणही सुरू केले. त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दखल या ठिकाणी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्यात आले. सध्या हा स्मृती स्तंभ आणि चौकाचे सुशोभिकरण झाले असून, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम या स्तंभाच्या माध्यमातून होत आहे.